गुगल पे : वाणगावमधील तरुणाची लाखोची फसवणूक

अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल

0
5291

डहाणू, दि. 29 : तालुक्यातील वाणगाव येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तरुणाची गुगल पे च्या माध्यमातून मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 7 हजार 233 रुपये इतकी रक्कम अज्ञात भामट्यांनी ऑनलाईन गैरव्यवहार करुन लंपास केली आहे.

मागील 2-3 वर्षात डिजीटल पेमेंट्सच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी आपले मोबाईल पेमेंट अ‍ॅप बाजारात आणले आहेत. जलद व सोप्या पद्धतीने बँकिंग व्यवहार करण्यासाठी हे अ‍ॅप्स उपयुक्त ठरत असल्याने कोट्यावधी लोक या अ‍ॅप्सचा वापर करतानाही दिसत आहेत. मात्र हीच जलद व सोपी पद्धत ऑनलाईन गैरव्यवहार करणार्‍या भामट्यांनाही फायदेशीर ठरत असल्याचे समोर येत आहे. कधी केवायसीच्या नावाखाली, कधी व्यवहार केल्याने मिळालेले कॅश स्वरुपातील बक्षिस प्राप्त करण्याच्या नावाखाली तर कधी होम डिलिव्हरीची सेवा देण्याच्या नावाखाली लाखो नागरीकांची या पेंमेट अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर ऑनलाईन गैरव्यवहार करणार्‍या भामट्यांचे चांगलेच फावले होते. विविध वस्तुंची होम डिलिव्हरी देण्याच्या नावाखाली या भामट्यांनी अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणगाव येथील तरुणाला देखील अशाचप्रकारे ऑनलाईन गैरव्यवहाराचा फटका बसला आहे. 27 जुलै रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास अज्ञात इसमाने त्याला फोन करुन व त्याच्या गुगल पे अ‍ॅपशी संबंधित गोपनिय माहिती मिळवून त्याच्या बँक खात्यातील 1 लाख 7 हजार 754 रुपयांपैकी 1 लाख 7 हजार 233 रुपये इतकी रक्कम इतर खात्यात वळवली आहे.

याबाबत सदर तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन वाणगांव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 417 व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 चे कलम 66 (ड) प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments