बोईसर : चेन स्नॅचिंग करणार्‍या दोघांना अटक

बोईसर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
2077

बोईसर : दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी देवदर्शन करुन घरी परतणार्‍या 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून फरार झाल्याची घटना येथील कोलवडे भागात घडली होती. 4 महिन्यांपुर्वी घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यात अखेर पोलिसांना यश आले असुन राहुल ऊर्फ लंगडा शर्मा व जतिन ऊर्फ बंड्या पोंटिंदे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत त्यांनी अशाचप्रकारे डहाणू येथे देखील चेन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

बोईसरमधील अमेयपार्क भागात राहणार्‍या हेमलता हरीचन्द्र पिंपळे या 9 मार्च रोजी सकाळी कोलवडे येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शनानंतर 10.30 च्या सुमारास त्या पुन्हा घरी परतण्यासाठी रिक्षात बसल्या असतानाच एक दुचाकी त्यांच्या बाजूला येऊन थांबली. यानंतर काही समजण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे 20 ग्राम वजनी मंगळसूत्र हिसकावून घटनास्थळावरुन पळ काढला होता. पिंपळे यांनी याबाबत बोईसर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला होता. मात्र आरोपींनी गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे न सोडल्याने पोलिसांपुढे त्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. गुन्हा घडलेल्या भागातील सीसीटिव्ही फुटेज खंगाळूनही पोलिसांच्या हाती काही लागले नव्हते.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करणार्‍या बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर राहुल ऊर्फ लंगडा रवी शर्मा (वय 27 वर्षे, रा. बोईसर) व जतिन ऊर्फ बंड्या भाऊ पोंटिंदे (वय 24 वर्षे, रा.टेंभोडा) या दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर अखेर दोघांनीही आपला गुन्हा मान्य केला. तसेच डहाणूत देखील अशाचप्रकारे एका महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किंमतीची चेन जबरदस्तीने खेचून चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली पॅशन प्रो ही दुचाकी हस्तगत केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे पोलीस उप निरीक्षक अभिजीत टेलर, सहाय्यक फौजदार सुनील नलावडे, विनायक ताम्हाणे, भरत पाटील, पोलीस हवालदार संतोष निकाळे, दिपक राऊत, संदीप सुर्यवंशी, पोलीस नाईक निरज शुक्ला व नरेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments