
मा. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, आपण दिनांक 17 जून 2020 रोजीच्या जावक क्रमांक 1309 च्या आदेशान्वये पालघर जिल्ह्यातील 82 खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केल्या. हा आदेश काढताना तुम्ही नेमका काय होमवर्क केला आहे? तुमचा होमवर्क कच्चा ठरला आहे का?
– संजीव जोशी [email protected]
संपादक – दैनिक राजतंत्र / rajtantra.com
वैयक्तिक संपर्क : 9822283444
Rajtantra Media 9890359090
जिल्हाधिकारी महोदय,
आपण दिनांक 17 जून 2020 रोजीच्या जावक क्रमांक 1309 च्या आदेशान्वये पालघर जिल्ह्यातील 82 खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केल्या. 82 जणांच्या यादीमध्ये MBBS, BAMS, BHMS अशा विविध शाखांच्या डॉक्टरांचा समावेश आहे. सदरहू आदेशाद्वारे डॉक्टरांच्या निवास, भोजन व भत्त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले आहे. ह्याच आदेशामध्ये डॉक्टरांनी टाळाटाळ केली किंवा विरोध दर्शविला तर फौजदारी कारवाई करण्याची धमकी देण्यात आलेली आहे.
तुमचे हे आदेश वाचून डॉक्टर मंडळी व्यथित झाली आहे. त्या बिचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आपल्याला प्राप्त झालेल्या अफाट अधिकारांची माहिती नसावी. त्यांना वेळेत ही माहिती मिळाली असती तर, त्यातील कितीतरी डॉक्टर्स हे स्पर्धा परिक्षेला बसून सनदी अधिकारी झाले असते. पण लोकांच्या सुदैवाने तसे झाले नाही. ही डॉक्टर मंडळी अधिकारांची नशा बाळगून स्पर्धा परिक्षांच्या फंदात न पडता, रुग्णसेवेत लागली. सर्वच क्षेत्रात भलेबुरे लोक असतात. तसे डॉक्टर मंडळींमध्येही असतील. परंतु आजच्या कोरोना संसर्गाच्या जागतिक संकटाच्या काळात सर्वात महत्वाचा कोरोना योद्धा डॉक्टरच आहे. त्यानंतर सर्व जण. नूसते आदेशांवर आदेश काढून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण यशस्वी होऊ असा भ्रम कोणी बाळगण्याचे कारण नाही. तुम्हाला तो नसणारच. पण मग हा आदेश काढताना तुम्ही नेमका काय होमवर्क केला आहे? तुमचा होमवर्क कच्चा ठरला आहे का?
तुम्ही डॉक्टरांच्या विविध संघटनांशी चर्चा केल्यात का? तुम्ही डॉक्टरांना सेवा पुरविण्याचे आवाहन केलेत का? आपण तसे केलेले नाही. डॉक्टर मंडळींशी तुम्ही सन्मानाने संवाद साधायला हवा होता. त्यांच्या कडून मार्गदर्शन घ्यायला हवे होते. त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. 82 काय 182 जण तयार झाले असते. तुमची यादी कोणी आणि कशी बनवली? त्यासाठी काही प्राधान्यक्रम ठरविले होते का? खासगी हॉस्पिटल बंद पडणार नाहीत याची खबरदारी यादी बनविताना घेतली का? कि एक ठिकाणी झाकण्यासाठी दुसरे उघडे पाडायचे? आदिवासी भाग असलेल्या जव्हार तालुक्यात आरोग्य सेवा देणाऱ्या, स्त्री रोगतज्ञ डॉ. अनिता पाटील यांनी त्यांचे रुग्णालय बंद करुन, तुमच्या सक्तीच्या सेवेत येणे हे तुम्हाला व्यावहारिक वाटते का? डहाणूच्या डॉ. नवनाथ सोनकाळेंना थेट मोखाड्यात ड्यूटीला बोलावणे योग्य नियोजन आहे का? जिल्ह्यात फक्त 82 डॉक्टर आहेत का? तुमच्या यादीत 5 भूलतज्ञ, 4 एम. डी. मेडिसिन, 10 एम.बी.बी.एस. डॉक्टर व अन्य आयुर्वेदीक व होमिओपॅथी डॉक्टर आहेत. आयुर्वेदीक व होमिओपॅथी डॉक्टरांनी त्यांच्या शास्त्राप्रमाणे उपचार करायचे की तुम्ही त्यासाठी काही तजवीज करणार आहात? तुम्ही ह्या डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट. मास्क, हॅन्डग्लोव्हज वगैरे पुरविणार आहात की त्यांनी स्वखर्चाने ही व्यवस्था करायची? काही देणार नसाल तरी सांगा. पण प्रेमाने सांगा. डॉक्टरांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. त्यांचे अवश्य समाधान करा.
तुम्ही आरोग्य क्षेत्रात फारसे संवेदनशीलतेने डोकावलेले दिसत नाही. तुमच्या यादीतील एक होमिओपॅथी डॉक्टर आदित्य अहिरे ज्यांची तुम्ही सक्तीने सेवा घेता आहात, त्यांच्यावर तुम्ही 19 मार्च रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला सॉफ्ट टार्गेट बनविले आहे. अपराध काय त्यांचा, तर अंबुजा सिमेंट व्यवस्थापनाने मजूरांना मास्क वाटप करतांना, कोरोना जनजागृतीसाठी डॉ. आदित्यला बोलावले व तरुण असल्याने उत्साहाने ते तिथे गेले. हजारो स्थलांतरित मजूरांचे तुम्ही काय हाल केले ते जनतेने बघितले आहेत. मजूरांना लाथ मारणाऱ्या तहसिलदाराचे अपराध तुम्ही पोटात घातलेले आहेत. मात्र डॉ. आदित्यवर गुन्हा दाखल करताना, तुम्ही काहीही होमवर्क केले नाही. आज अनेक आदित्यंची उपयुक्तता तुम्हाला उशीराने का होईना, पटली असेलच.
डहाणू तालुक्यात, 28 मे रोजी भरधाव पीकअप वाहनाने मोटारसायकलला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात रात्रपाळीची कर्तव्यपुर्ती करुन मोटारसायकलवरुन डबलसीट बसून घरी परतणाऱ्या परिचारिका सौ. प्रिया प्रभाकर संखे (50) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सौ. प्रिया ह्या ऐने प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. हे तुमचे फेल्युअर होते. एसटी बस, रिक्षा सेवा सारख्या सार्वजनिक सेवा बंद असताना कोरोना योद्ध्यांना सेवा बजावण्यासाठी परिवहन व्यवस्था करणे तुमचे कर्तव्य होते. तुम्ही सपशेल अपयशी ठरलात. नशीबाने परिचरिकेला मोटारसायकलवर लिफ्ट देणाऱ्या मृतावर डबलशिट मनाई असताना लिफ्ट दिल्याने फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही.
तुमच्या व्यवस्थेत सर्व काही ठिकठाक नाही हे अनेक उदाहरणांवरुन दिसून येते. डहाणू नगरपरिषदेच्या एका कोरोना योद्ध्याला 15/16 जून रोजी ताप आला होता. परदेशी प्रवासाचा इतिहास असलेल्या किंवा कोरोना संसर्ग झालेल्या लोकांना विलगीकरण करणे व त्यांच्यावर देखरेख करण्याची जबाबदारी ह्या कोरोना योद्ध्यावर होती. तुमच्या यंत्रणेच्या नजरेत हा योद्धा आलाच नाही. तो अचानक 26 जून रोजी डॉ. कांबळे यांच्या सिद्धार्थ नर्सिंग होममध्ये पोहोचला. डॉ. कांबळे यांनी त्याला ताप आल्याचे पाहून व श्वासात अडथळा येत असल्याचे पाहून त्वरित उप जिल्हा रुग्णालयात पाठवले. हा योद्धा पॉझिटीव्ह निघाला. त्याच्यावर आता रिव्हेरा कोव्हीड सेंटर (विक्रमगड) मध्ये उपचार चालू आहेत. तुमच्या व्यवस्थेपेक्षा जिल्हा दैवावरच अधिक अवलंबून आहे. डॉ. कांबळे यांनी जबाबदारीने त्वरित स्वतःचे रुग्णालय निर्जंतुकीकरण करुन बंद केले व स्वतःला क्वारन्टाईन करुन घेतले. सुदैवाने डॉ. व संबंधित परिचारिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. हे सर्व होत असताना, तुमचा प्रशासनाचा फौजफाटा सिद्धार्थ हॉस्पिटल सील करुन आला. डॉ. कांबळे यांच्याशी कुठलाही संवाद न साधता ही कारवाई करण्यात आली. जणू काही डॉ. कांबळे यांनी मोठा अपराध केला आहे. जिल्हाधिकारी महोदय, प्रशासनाने संवाद वाढवायला हवा.
जिल्हाधिकारी महोदय, तुमचा होमवर्क तपासायची वेळ आली आहे. डहाणू तालुक्यातील 500 खाटांचे रुग्णालय सलग्न असलेल्या वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ह्या वैद्यकीय महाविद्यालयात तुम्ही सुरु केलेल्या 250 खाटांच्या डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटलमध्ये व 250 खाटांच्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 0 का आहे? जिल्ह्यातील 82 डॉक्टरांना फौजदारी कारवाईच्या धमक्या देणारे आदेश काढण्यापूर्वी तुम्ही वेदान्त व्यवस्थापनाला देखील कडक आदेश बजावले असणारच अशी अपेक्षा आहे. जनतेला हे सर्व जाणून घ्यायचे आहे. (क्रमशः)