त्या 3 वर्षीय मुलीचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह! प्रशासन सुस्त, शासकीय प्रेस नोट मध्ये पॉझिटीव्ह उल्लेख!

0
769

डहाणू दि. 15: डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 3 वर्षीय मुलीचा नव्याने केलेल्या तपासणीचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आला आहे. या मुलीचा 13 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला होता. मात्र मुलीची प्रकृती पूर्णपणे बरी असताना आणि परदेश प्रवास केलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात आलेली नसताना तीचा अहवाल पॉझिटीव्ह कसा आला, याबाबत आरोग्य विभागाला प्रश्न पडला होता. आता नवी टेस्ट निगेटीव्ह आल्याचे सुत्रांकडून समजते. मात्र याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांना विचारले असता अजून रिपोर्ट हाती आला नसल्याचे सांगितले आहे. सकारात्मक व आशादायक बातमी असताना प्रशासन अजून सुस्त आहे. आता उशीरा आलेल्या शासकीय प्रेस नोट मध्ये अजून डहाणूमध्ये 1 पॉझिटीव्ह नोंद कायम दाखवली आहे.

रुग्ण मुलीचे आई व वडील पालघर तालुक्यातील, काटोळे गावाच्या हद्दीत वीटभट्टीवर कामाला होते. तेथे मुलीला खोकला व ताप आल्यामुळे मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला दाखवण्यात आले. तेथून मुलीचे आई वडील डहाणू तालुक्यातील गंजाड येथील गावी परतले. तेथून मुलीला 9 एप्रिल रोजी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व 13 तारखेला तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. या बातमी नंतर एकच खळबळ उडाली होती. मुलीच्या आई वडीलांच्या व मुलीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना मोठ्या प्रमाणावर कॉरन्टाईन करण्यात आले होते. अखेर आज या सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. आधीचा रिपोर्ट सदोष होता की मुलीवर उपचार केल्यानंतर रिपोर्ट निगेटीव्ह आला, याविषयी आरोग्य विभागाने अजूनही मौन बाळगले आहे.

सोशल मिडीया सबसे तेज: सकारात्मक बातमी असताना, जिल्हा प्रशासनाने अजूनही प्रेस नोट जारी करुन तपशील जाहीर केलेला नाही. सोशल मिडीयावर बातम्या व्हायरल होईपर्यंत प्रशासनाकडे अहवाल पोचलेला नव्हता. पत्रकारांना मात्र जबाबदारीचे काम असल्याने खातरजमा केल्याशिवाय व अधिकृत पुष्टी झाल्याशिवाय वृत्त प्रसारित करता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. 3 वर्षांच्या चिमुकलीसाठी सर्वजण प्रार्थना करीत असल्यामुळे व सकारात्मक बातमी असल्यामुळे अधिकृत घोषणा झालेली नसताना दैनिक राजतंत्रतर्फे हे वृत्त प्रसारित केले जात आहे.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments