दिनांक 09 April 2020 वेळ 3:42 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डहाणू आगाराची विशेष खबरदारी

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डहाणू आगाराची विशेष खबरदारी

प्रतिनिधी/डहाणू, दि. 20 : करोना विषाणूच्या जीवघेण्या आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले असतानाच दिवसेंदिवस राज्यात करोना विषाणूंमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सामाजिक संपर्कातून या विषाणूचा फैलाव होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या डहाणू आगारातही विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

पालघर येथील विभागीय कार्यालयाकडून चालक, वाहक व इतर कर्मचार्‍यांसाठी मास्क, हात मोजे व चांगल्या प्रतीचे जंतूनाशक इत्यादी अनेक वस्तू पुरविण्यात आल्या असून आगारातील शौचालये, मुतार्‍या, बसस्थानक तसेच संबंधित इतर ठिकाणे जंतुनाशक पावडर, औषधांचा वापर करुन दररोज स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. तसेच आगारातील सर्व बसेस आतुन व बाहेरुन निर्जंतुक औषधांचा वापर करुन नियमित स्वच्छ करण्यात येत आहेत. चालक, वाहक व कर्मचार्‍यांना वैयक्तीक स्वच्छता ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. चालक वाहक विश्रांती गृह, यांत्रिक विश्रांती गृह, महिला विश्रांतीगृह हे दिवसातुन दोन वेळा निर्जंतुकीकरण औषधांचा वापर करुन स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. नगरपालिका विभागास लेखी पत्राद्वारे कळवून आगार परिसराची साफसफाई करण्यात आली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे डहाणू-सातारा व डहाणू-बिड या बस फेर्‍या सध्या अनुक्रमे ठाणे व कल्याणपर्यंतच जात आहेत. तसेच तालुक्यातील सर्व शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असल्याने शालेय फेर्‍या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षेच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी सर्व बसफेर्‍या सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

डहाणू रेल्वे स्थानकात विविध उपाय योजना

जीवघेण्या करोना विषाणूचा मागील काही दिवसांपासून राज्यात शिरकाव झाला असून डहाणू रेल्वे स्थानकात रोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध उपाय योजना अंमलात आणल्या जात आहेत. रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीच्या बाहेरील भाग, बसण्याचे बाक, प्रवाशांसाठी असलेल्या जिन्याचे लोखंडी रेलींग या व अशा प्रवाशांच्या संपर्कात येणार्‍या अनेक जागा दर तीन-चार तासांनी चांगल्या प्रकारचे जंतूनाशक वापरून स्वच्छ करण्यात येत आहेत. तसेच स्वच्छता कर्मचार्‍यांना स्वतंत्रपणे वापरासाठी हातमोजे, मास्क व इतर साहित्य पुरविण्यात आले आहे, अशी माहिती प्रबंधक आर. सी. शर्मा यांनी दिली. मागील 3-4 दिवसांपासून 25 टक्के रेल्वे प्रवाशांची संख्या घटली असून पुढील काही दिवसात 50 ते 60 टक्के प्रवाशांमध्ये घट होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. तसेच प्रवाशांना पोहोचवायला येणार्‍यांची गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर 10 रुपयांवरुन 50 रुपये करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनामार्फत वेळोवेळी या संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करुन अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top