दिनांक 09 April 2020 वेळ 1:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » हातावर अलगीकरण शिक्का; पालघर रेल्वे स्थानकात 4 प्रवाशांना एक्सप्रेसमधुन उतरवले

हातावर अलगीकरण शिक्का; पालघर रेल्वे स्थानकात 4 प्रवाशांना एक्सप्रेसमधुन उतरवले

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 18 : जर्मनी येथून परतलेल्या व गरीब रथ एक्सप्रेसने गुजरात राज्यातील सुरत येथे आपल्या मुळगावी निघालेल्या चार प्रवाशांना सहप्रवासी व तिकीट तपासनीस यांनी करोनाबाधित असल्याच्या संशयातून पालघर रेल्वे स्थानकात गाडी थांबवून उतरण्यास भाग पाडल्याची घटना आज, बुधवारी घडली. या चारही प्रवाशांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का असल्याचे सह प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर हा सर्व प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटूंबातील चार जण आज 12216 डाऊन वांद्रे टर्मिनस-दिल्ली गरीब रथ एक्सप्रेसच्या जी 4 व जी 5 या डब्ब्यांमधुन प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या हातावर अलगीकरण करण्याचे शिक्के असल्याचे सहप्रवाशांनी पाहिल्यानंतर सदर प्रवासी करोना बाधित असल्याच्या संशयातून त्यांनी ही बाब तिकीट तपासनीसच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर तिकीट तपासनीसांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून थांबा नसतानाही गाडी पालघर रेल्वे स्थानकात थांबविण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पालघर रेल्वे स्थानकात दिल्लीकडे जाणारी गाडी थांबत असून या गाडीत करोनाबाधित रुग्ण असल्याची उद्घोषणा फलाटावर करण्यात आल्याने उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली व काही वेळातच फलाट रिकामी करण्यात आला. दोन वाजण्याच्या सुमारास ही गाडी पालघर रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर या चार प्रवाशांना स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले. येथे आरोग्य पथकाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर चौघांंमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली नाहीत.

असे असले तरी खबरदारी म्हणून या रुग्णांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्याची तयारी करण्यात आली होती. नंतर त्यांना बोईसर येथील टिमा रुग्णालयात निर्माण केलेल्या स्वतंत्र अलगीकरण कक्षात ठेवण्याचे देखील प्रयत्न करण्यात आले. मात्र या प्रवाशांनी पालघरमध्ये वास्तव्य करण्यास नकार देऊन आपल्या मूळ गावी जाण्याचा आग्रह धरल्याने राज्य करोना कक्षाशी संपर्क साधून त्यांच्याकडून मार्गदर्शन सूचना प्राप्त केल्यानंतर खासगी वाहनातून त्यांना सूरतच्या दिशेने पाठवण्यात आल्याची माहिती पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

दरम्यान, जर्मनीहून परतलेल्या या प्रवाशांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच आरोग्य तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात आली होती. यात ते निगेटिव्ह आढळल्यानंतर केवळ खबरदारी म्हणून त्यांना 14 दिवसांपर्यंत स्वत:च्या घरात अलगीकरण (क्वारंटाइन) करून राहण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या व त्यानुसार त्यांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top