दिनांक 09 April 2020 वेळ 2:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » करोना : पालघर जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू

करोना : पालघर जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आदेश

पालघर, दि. 16 : जगभरात दहशत निर्माण केलेल्या करोना विषाणूचे राज्यभरातही रोज नविन रुग्ण आढळत असल्याने या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे आवश्यक ते पाऊलं उचलण्यात येत आहेत. त्यानुसार, पालघर जिल्ह्यातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु असुन जिल्ह्यातील सर्व धार्मिक व पर्यटन स्थळांवर 31 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तर यापुर्वीच जिल्ह्यातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, शैक्षणिक संस्था तसेच चित्रपट गृहे, नाट्यगृहे, तरण तलाव, जिम, मॉल्स हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी पारित केले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना (कोव्हिड 19) बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे अनेक प्रवासी भारतातील विविध भागात प्रवास करीत आहेत. पालघर जिल्ह्यातही परदेशात प्रवास करुन आलेले नागरीक आहेत. तर बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांकडून करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यानुसार रविवारीच (दि. 15) जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये तसेच चित्रपट गृहे, नाट्यगृहे, तरण तलाव, जिम, मॉल्स हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर आता जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

यात झाई, बोर्डी, डहाणू, शिरगांव, सातपाटी, केळवा, अर्नाळ्यासह जिल्ह्यातील इतर सर्व समुद्र किनारे, धरणे, किल्ले त्याचबरोबर विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिर संस्थान, विरार येथील जिवदानी माता संस्थान, केळव्यातील शितलादेवी, गालतरे येथील इको व्हिलेज (इस्कॉन), वाघोलीतील शनि मंदिर, तुंगारेश्वर येथील सदानंद बाबा आश्रम तसेच जिल्ह्यातील इतर सर्व धार्मिक स्थळे (देवस्थानच्या पुजार्‍याकडून केली जाणारी वैयक्तिक पुजा व अर्चा वगळून) इत्यादी ठिकाणी 16 ते 31 मार्च दरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

या मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51(ल) नुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top