पोलीस गुटखा पकडतात कि पचवतात? जप्त केलेला गुटखा जातो कुठे?

पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास रोज किंवा दिवसाआड गुटख्याच्या गाड्या पकडल्या जातात. इतका गुटखा जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला जात असताना जिल्ह्याभरात कुठेही सहजच गुटखा उपलब्ध होतो. तो देखील चोरीछुपे नाही, खुले आमपणे! कारण जप्त केलेला कोट्यावधी रुपयांचा गुटखा पुन्हा स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतो असा आरोप केला जात आहे. पोलीसच तो परस्पर विकतात, असा पोलिसांवर आरोप केला जातो. सत्यस्थिती काय हे आम्ही पडताळण्याचा प्रयत्न केला असता हे आरोप खरे असावेत, अशी परिस्थिती आहे.

पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांनी एक खोके तंबाखूजन्य गुटखा जाळून बघावा वास कितीपर्यंत येतो ते. मग 2/5 ट्रक गुटखा जाळल्यानंतर किती दूरपर्यंत वास जाईल व त्याचा लोकांवर काय दुष्परिणाम होईल ते तपासावे. वैद्यकीय अधिकार्‍यांची मदत घ्यावी. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिकच्या आवरणातील विषारी गुटखा असा जाळून नष्ट करता येईल का? याची खातरजमा करावी म्हणजे पोलिसांनी जाळून नष्ट केला तो गुटखा होता कि कचरा? हे समजणे सोपे जाईल. त्यांना समजल्यावर ते जनतेसमोर जरुर आणावे.

आम्ही माहितीच्या अधिकारात, तलासरी, कासा आणि मनोर या 3 पोलीस ठाण्यांकडून गुटखा जप्तीचे पंचनामे, गुटखा नष्ट करण्यासाठीची विहित पद्धती व तत्संबंधी मार्गदर्शक तत्वे, नष्ट करतानाचे व्हिडिओशूटिंग अशी माहिती मागितली. एकाही पोलीस ठाण्याने आम्हाला माहिती उपलब्ध करण्यात सकारात्मक भूमिका घेतली नाही. तीनही पोलीस ठाण्यांनी माहिती नाकारली.

मग आम्ही अपील केले. डहाणूचे उप विभागीय अधिकारी श्री मंदार धर्माधिकारी व पालघरचे उप विभागीय अधिकारी यांनी अपील मंजूर करुन माहिती उपलब्ध करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे तलासरी पोलिसांनी माहिती उपलब्ध केली. मात्र मनोर पोलिसांनी माहिती न्यायालयात सादर केल्याचे नमूद करुन पोलीस ठाण्यात माहिती उपलब्ध नसल्याचे कळवले आणि केवळ गुन्ह्याची यादी दिली. जव्हारच्या उप विभागीय अधिकारी यांनी कासा पोलिस ठाण्याच्या अपिलाची सुनावणी 4 महिने झाले तरी अजून घेतलीच नाही. सध्या तरी कासा पोलीस आणि मनोर पोलीस गुटखा झाकून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

गुटख्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी काही गैरप्रकार केला नसेल तर लपवाछपवी का?
सर्वात महत्वाचे म्हणजे गुटखा प्रतिबंधाची कारवाई करणे हे अन्न व औषध प्रशासनाचे काम आहे. परंतु पालघर जिल्ह्यात रेती, गुटखा व दारु संबंधित विभागांपेक्षा पोलिसच अधिक पकडताना दिसतात. आणि त्यामध्ये त्यांना खूप मजा येते आहे असे दिसते. गुटखा पकडल्यानंतर पोलिसांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कळवून त्यांच्याकडे मुद्देमाल सुपूर्द करायला पाहिजे. पोलिसांकडे गुटखा साठवण्यासाठी पुरेशी जागा नाही असे पोलिसांचे म्हणणे असताना पोलीस गुटख्याचा साठा स्वतःकडे ठेवण्यात धन्यता मानतात. आणि मग तो आपोआप नष्ट होतो किंवा न्यायालयाची परवानगी मागितली जाते. न्यायालयाकडे परवानगी मागताना अपुरी जागा व दुर्गंधी अशी कारणे दिली जातात.

प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल येण्याआधी आणि आरोपपत्र सादर करण्यापूर्वीच गुटखा नष्ट केला जातो. पोलिसांच्या अशा कार्यपद्धतीवर शंका घेण्यास पूर्णपणे वाव आहे.

मनोर पोलिसांनी आतापर्यंत गुटखा नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली नसल्याचे कळविले आहे. त्यांच्याकडे मुद्देमाल शाबूत आहे किंवा त्याला पाय फुटले आहेत, या विषयी पोलीस अधिक्षक गौरव सिंग हेच काय ते सांगू शकतील.

कासा पोलीस ठाण्यातर्फे माहिती नाकारण्यात आली असली तरी, अर्ज करण्यापूर्वी कासाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना गुटखा नष्ट केला किंवा कसे? या प्रश्नाचे उत्तर होय असे दिले. तो कसा नष्ट केला? असा प्रश्न विचारल्यावर नदीच्या पात्रात खड्डा खणून त्यामध्ये गुटखा जाळल्याचे सांगितले. वास्तविक केंद्र सरकारच्या 1991 च्या अधिसूचनेप्रमाणे डहाणू तालुका पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील घोषित करण्यात आलेला असताना खरोखरीच पोलीस नदी पात्रात गुटखा जाळून पाणी व हवेचे प्रदूषण करत असतील तर त्यांच्यावर प्रदूषण प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल होऊ शकतील. काळेंना अशा पद्धतीने गुटखा जाळता येईल का? या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. प्रामाणिकपणे गुटखा निर्मूलन करायचे असल्यास पोलीस अधिक्षकांनी समजून घ्यावे, कासा पोलिसांनी असा गुटखा खरच जाळला आहे किंवा विकला आहे. जाळला असेल तर त्याप्रमाणे व विकला असेल तर त्याप्रमाणे कारवाई करावी. कासा पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा गुटखा जाळल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध आहे.

तलासरी पोलिसांनी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार त्यांनी वर्षभरात 15 गुन्ह्यांत जप्त केलेला गुटखा न्यायालयाच्या परवानगीने जाळून नष्ट केला आहे. सर्वप्रथम 12 डिसेंबर 2018 रोजी 3 गुन्ह्यातील माल जाळून टाकला. 9 मार्च 2019 रोजी 3 गुन्ह्यातील गुटखा जाळला. 30 मार्च 2019 रोजी 1 गुन्ह्यातील गुटखा नष्ट केला. 7 जून 2019 रोजी 8 गुन्ह्यातील जप्त गुटखा जाळला. न्यायालयात केलेला अर्ज व न्यायालयाने दिलेली परवानगी हे विषय स्वतंत्रपणे चर्चा करता येतील. तूर्तास पोलीस अधीक्षकांच्या माहितीसाठी महत्वाची माहिती अशी देता येईल कि, 1 मे 2019 रोजी गुन्हा दाखल क्रमांक 63/2019 दाखल झालेल्या गुन्ह्यात जप्त गुटखा नष्ट करण्यासाठी पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी 20 मे 2019 रोजी डहाणू न्यायालयाला अर्ज दिला. न्यायालयाने तो अर्ज 22 मे रोजी मंजूर करुन तपासी अंमलदाराच्या जबाबदारीवर नष्ट करण्याचे आदेश दिले. 7 जून 2019 रोजी 96 लाख रुपयांचा गुटखा जाळून नष्ट केल्याचा पोलिसांचा दावा आहे. यासंबंधातील पंचनाम्यांवर त्याच त्या सराईत पंचांच्या स्वाक्षर्‍या आहेत. प्रतिष्ठित पंच म्हणून उल्लेख असलेले यातील बहुतेक पंच मजुरी करणारे आहेत. काही पंचनाम्यांवर तर सह्याच नाहीत. जागा कोरी आहे.

आम्हाला शंका आहे, गुटखा जाळलाच नाही, प्रत्यक्षात कचरा पॅकिंग जाळले आणि गुटखा तस्करांच्या हवाली केला. अर्थात ही शंका आहे. पोलिसांनी झाकून ठेवल्यामुळे शंका गडद झाली इतकीच. पोलीस अधीक्षकांनी खरे काय ते जनतेसमोर आणावे.

कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांनी गुटखा तस्करीमध्ये आतापर्यंत जप्त केलेल्या किती वाहनांचे व वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यासाठी परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर केले याबाबतही जनतेसमोर माहिती उपलब्ध करावी. (क्रमशः)

Print Friendly, PDF & Email

comments