दिनांक 09 April 2020 वेळ 2:34 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » चिकनमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव नाही

चिकनमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव नाही

प्रतिनिधी/डहाणू, दि. 20 : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना विषाणूची लागण झाल्याने कित्येक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. परंतु सोशल मिडियावरील चुकीच्या पोस्टमुळे नागरिकांच्या मनात या रोगाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. चिकन खाल्यानेच या रोगाची लागण होते, अशा बर्‍याच पोस्ट फेसबुक, व्हॉट्सअपवर फिरताना दिसत आहेत. परंतु शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास चिकन आणि करोना या रोगाचा दुरान्वये संबंध नाही.

कुकुट पक्षातील कोणताही विषाणू मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. कारण आपल्याकडे चिकन हे पूर्णपणे शिजवूनच त्याचे सेवन केले जाते. चिकन आणि करोनाचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. चिकन सेवन करणे व त्याचा मानवी आहारामध्ये वापर करणे याबाबत करोना संदर्भाने पसरवलेले वृत्त चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले. या विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो याची निश्चित माहिती आजच्या घडीला उपलब्ध नाही. मात्र लक्षणाचे स्वरूप पाहता शिंकणे, खोकणे तसेच हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा अंदाज आरोग्य खात्याने काढलेला आहे. करोना रोगाची लागण हा जरी प्राणीजन्य आजार असला तरी नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्यांच्या संपर्कातून पसरतो याबद्दल सध्या निश्चित माहिती नाही. त्यामुळे नागरिकांनी या रोगाची कसलीही भीती न बाळगता करोनाचा चिकनशी संबंध जोडणार्‍या कोणत्याही मेसेज व पोस्टवर विश्‍वास ठेऊन नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top