दिनांक 09 April 2020 वेळ 2:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालय व रशियन स्टेट मानव्यविद्या विद्यापीठात सामंजस्य करार

दांडेकर महाविद्यालय व रशियन स्टेट मानव्यविद्या विद्यापीठात सामंजस्य करार

विविध अभ्यासक्रमांची होणार देवाण-घेवाण

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 16 : आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध अभ्यासक्रमांची देवाण-घेवाण व्हावी तसेच पालघर परिसरातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी, याकरिता सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व जागतिक स्तरावरील पहिल्या शंभर विद्यापीठात स्थान असलेल्या रशिया देशातील रशियन स्टेट मानव्यविद्या विद्यापीठ यांच्यात नुकताच शैक्षणिक व सांस्कृतिक आदान-प्रदानाचा सामंजस्य करार करण्यात आला.

याप्रसंगी सदर रशियन विद्यापीठाच्या तज्ञ शिष्टमंडळाने दांडेकर महाविद्यालयाला भेट दिली. यामध्ये या विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अभ्यास केंद्राचे प्रोफेसर अलेक्झांडर स्तोलारोव्ह, डॉ. इंदिरा गाझीयेवा, डॉ. इरिना मॅक्झीमेनका आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य विभागाचे प्रमुख प्रोफेसर इल्या महानोव तसेच काही रशियन विद्यार्थी उपस्थित होते. यासोबत मुंबई विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक व या दोन्ही संस्थांमधील समन्वयक प्रोफेसर संजय देशपांडे उपस्थित होते. सोनोपंत दांडेकर शिक्षण संस्थेकडून संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड्. जी. डी. तिवारी, कोषाध्यक्ष हितेंद्र शाह, सचिव प्रा. अशोक ठाकूर, सचिव अतुल दांडेकर, सहसचिव जयंत दांडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, पर्यवेक्षक प्रा. महेश देशमुख, डॉ. तानाजी पोळ, प्रा. विवेक कुडू, डॉ. हर्षद वनमाळी, प्रा. अनघा पाध्ये, डॉ. मनीष देशमुख, डॉ. दिलीप यादव, प्रा. रामदास येडे इ. प्राध्यापक या सामंजस्य कराराच्या बैठकीला उपस्थित होते.

या अभ्यास दौर्‍याच्या प्रसंगी रशियन शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या. महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रम व पायाभूत सुविधा याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक देवाण-घेवाण, हिंदी आणि रशियन भाषेचे पदवीका अभ्यासक्रम, समर स्कुल, संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रशियन विद्यापीठातील ऑनलाईन कोर्सेस व त्यासंबंधीची अभ्यास साधने यांची देवाण-घेवाण याविषयी सामंजस्य करार करण्यावर सहमती झाली व शैक्षणिक वर्ष 20-21 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे दोन्ही संस्थांकडून सांगण्यात आले.

या सामंजस्य कराराच्या पूर्वतयारीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. तानाजी पोळ व प्रा. भगवान जयस्वाल यांनी मास्को येथील रशियन स्टेट मानव्यविद्या विद्यापीठाला भेट दिली होती. या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व मुंबई विद्यापीठाचे मध्य युरेशीयन अभ्यासकेंद्राचे प्रमुख प्रोफेसर संजय देशपांडे यांनी केले. या सामंजस्य कराराला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. रविंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

comments

About Rajtantra

Scroll To Top