डहाणू : वीटभट्टी मालकाच्या जोखडातून आदिवासी मजूरांची सुटका

0
416

आरोपी मालकाला अटक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि.12 : तालुक्यातील चिंचणी गावातील नागेश्वरी पाडा भागात राहणार्‍या कातकरी कुटुंबातील मजूरांना मारहाण करुन त्यातील दोघांचे अपहरण करणार्‍या वीटभट्टी मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिनेश तरे (रा. भिवंडी) असे सदर वीटभट्टी मालकाचे नाव असुन श्रमजीवी संघटनेमुळे सदर आदिवासी मजूरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

डहाणू तालुक्यातील कासा वाघाडी येथील कातकरी समाजाचे दहा-बारा कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तंबू बांधून चिंचणी नागेश्वरी पाड्यावर राहतात. यापुर्वी ते भिवंडीमधील गाणे गावात वीटभट्टीवर काम करत होते. गाणे येथील वीटभट्टी मालक दिनेश तरे याने या कुटूंबांपैकी रेखा सवरा हिच्या कुटुंबाला 13 हजार रुपये बयाणा दिला होता. त्यानुसार त्यांच्याकडून कामही करुन घेतले होते. मात्र तरे कामाचा योग्य मोबदला देत नसल्याने रेखाच्या कुटूंबाने त्याचे काम सोडले होते. या गोष्टीला तीन वर्ष उलटले असताना रविवारी रात्री अचानक वीटभट्टी मालक तरे नागेश्वरी पाड्यावर पोहोचला. यावेळी त्याने त्याच्या इतर साथीदारांसोबत जबरदस्तीने रेखाच्या घरात घूसुन संपुर्ण कुटूंबाला मारहाण केली. तसेच रेखाचा भाऊ विजय वाघात आणि दिनेश वाघात यांना जबरदस्तीने गाडीत भरून नाणे गावात नेले.

ही बाब श्रमाजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली व तत्काळ पीडित कुटूंबाला चिंचणी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मालकाविरोधात अपहरण, अ‍ॅट्रॉसिटी, वेठबिगार प्रतिबंधक कायदा व विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हे दाखल करुन तातडीने सूत्र हलवत अपहरण झालेल्या मजुरांची सुटका केली व आरोपीला बेड्या ठोकल्या.

Print Friendly, PDF & Email

comments