वाड्यात ट्रेलरचे अपहरण करून लाखोंची चोरी

0
446

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 16 टन लोखंड लांबवले

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यातील आबिटघर येथून मुंबईकडे लोखंड घेऊन चाललेल्या एका ट्रेलरचे चालक व वाहकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करून त्यामधील 16 टन लोखंडाची चोरी केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.10) रात्रीच्या सुमारास वाडा-भिवंडी महामार्गावर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आबिटघर येथे सुर्या ही लोखंडी सळ्यांचे उत्पादन घेणारी कंपनी आहे. या कंपनीतून नेहमी शेकडो टन लोखंडाची वाहतूक होत असते. सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास एम.एच. 43/यु. 7965 या क्रमांकाचा ट्रेलर सुर्या कंपनीतून सुमारे 26 टन लोखंडी सळ्या घेऊन मुंबईकडे रवाना झाला. मात्र वाडा – भिवंडी मार्गाने जात असताना अवघ्या पाऊण तासात म्हणजेच रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खुपरी नजीक अज्ञात चोरट्यांनी वेरना कार ट्रेलर समोर आडवी उभी करुन ट्रेलर थांबवला. यानंतर गाडीतील तोंडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात इसमांनी ट्रेलरचा चालक दिपक शिवप्रसाद व वाहक अभिषेक सिंग यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून खाली उतरवले व त्यांनी आणलेल्या कारमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर कारमधीलच अन्य इसमाने ट्रेलर घेऊन पोबारा केला.

सदर चोरट्यांनी ट्रेलरच्या चालक व वाहकाला रात्री उशीरा मुंबई अहमदाबाद मार्गावरील चिल्हार फाटा येथे सोडून दिले. तसेच ट्रेलरही वाडा मनोर मार्गावरील कंचाड येथे टाकून पोबारा केला. दरम्यानच्या काळात ट्रेलरमधील सुमारे 16 टन लोखंडी सळ्या लंपास असल्याचे निदर्शनास आले असून बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 7 लाख रुपयांपर्यंत आहे.

याप्रकरणी पाच अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 395, 398, 365 व शस्त्र अधिनियम 3 व 25 अन्वये वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments