दिनांक 24 February 2020 वेळ 6:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डम्पिंग ग्राऊंडच्या स्थलांतरणासाठी वाडा वासियांचे आंदोलन

डम्पिंग ग्राऊंडच्या स्थलांतरणासाठी वाडा वासियांचे आंदोलन

नगरपंचायत प्रशासनाविरोधात दिल्या घोषणा

दिनेश यादव /वाडा, दि. 20 : वाडा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सिद्धेश्वरी नदीला लागूनच वाडा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंड बनविल्याने नदीचे पाणी दुषित होऊन पर्यावरणासह शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड इतरत्र हलवावे या मागणीसाठी नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला अनेक निवेदने व विनंती अर्ज देऊनही त्याची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने अखरे वाड्यातील गावदेवी मित्र मंडळाने आक्रमक पवित्रा घेत आज, सोमवारी (दि. 20) सदर डम्पिंग ग्राऊंडवरच आंदोलन करत नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध आंदोलन केले.

वाडा शहराच्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. शहराची लोकसंख्या 25 ते 30 हजारांच्या आसपास असून नगरपंचायत शहरातून दररोज साधारण चार टन कचरा गोळा करुन डम्पिंग ग्राऊंडवर टाकत असते. वर्षभरापूर्वी भिवंडी – वाडा महामार्गालगत नगर पंचायत हद्दीतील कचरा टाकण्यात येत होता. परंतु या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना तसेच स्थानिकांना कचर्‍याचा उग्र वास तसेच कचरा पेटवल्यानंतर त्यातून निघणार्‍या धूराचा त्रास होत असल्याने सदर डंपींग ग्राऊंड अन्यत्र स्थलांतरीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार एप्रिल 2019 ला तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या काळासाठी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सिद्धेश्वरी नदीजवळ डम्पिंग ग्राऊंड हलविण्यात आले. मात्र या डम्पिंग ग्राऊंडचा कचरा तसेच दूषित घाण व पाणी सरळसरळ नदीपात्रात उतरत असल्याने नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी याविरोधात वारंवार तक्रारी व विनंत्या करुन हे डम्पिंग ग्राऊंड अन्यत्र स्थलांतरीत करण्याची मागणी केली होती. मात्र नगर पंचायत प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने अखरे गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी वाडा शहरासाठी जीवनदायी असणार्‍या सिद्धेश्वरी नदी काठच्या या डम्पिंग ग्राऊंडवरच आंदोलन छेडून नगर पंचायत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नगर पंचायत प्रशासनाने तात्काळ डंपींग ग्राऊंड अन्यत्र स्थलांतरीत करावे आणि या डंपिंग ग्राऊंडच्या विळख्यातून नदीची सुटका करून वाड्यातील नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका कमी कमी करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात गावदेवी मित्र मंडळाचे राजेंद्र पाटील, राजेंद्र समेळ, अतिष बागुल, तेजस पाटील, सोनू देहेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या संदर्भात नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

comments

About Rajtantra

Scroll To Top