दिनांक 24 February 2020 वेळ 7:12 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा तालुक्यातील घाटमाथ्यांवर हरिनामाचा गजर

मोखाडा तालुक्यातील घाटमाथ्यांवर हरिनामाचा गजर

  • नाथभक्तांच्या पदस्पर्शाने रस्ते झाले पावन
  • मोखाड्यातील घाटातुन पायी दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे करताहेत मार्गक्रमण

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 17 : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे 20 जानेवारीला होणार्‍या संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी वेगवेगळ्या भागातून पायी दिंड्या निघाल्या आहेत. या दिंड्या आता मोखाड्यातील सुर्यमाळ – आमला आणि तोरंगण घाटातुन मार्गक्रमण करत आहेत. यावेळी घाटातील रस्त्यात ठिकठिकाणी रिंगण आणि माऊलीचा गजर करत वारकरी तल्लीन होत आहेत. त्यामुळे माऊलीच्या गजराने, मोखाड्यातील डोंगर-दर्‍या दुमदुमल्या आहेत.

शेकडो वर्षाची अखंडीत परंपरा असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी पायी दिंड्या घेऊन येतात. हीच परंपरा पालघर, ठाणे जिल्ह्यातील आणि गुजरात हद्दीतील वारकर्‍यांनी जपली आहे. पालघर, वाडा, भिवंडी, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि गुजरात हद्दीतील वारकरी पायी दिंड्या घेऊन त्र्यंबकेश्वर येथे निघाले आहेत. या पायी दिंड्या आता मोखाड्यात दाखल होत आहेत. तर काही दिंड्या खोडाळा आणि मोखाडा येथे मुक्कामी राहून मार्गस्थ झालेल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने वारकर्‍यांच्या दिंड्या रोजच येत आहेत. दिंडीतील महिला, पुरूष आणि अबालवृद्ध वारकरी घाटातील रस्त्यांमध्ये टाळ, मृदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन माऊलीचा गजर करत आहेत. तर कुठे रिंगण करून महिला फुगड्या खेळत आहेत. त्यामुळे मोखाड्यातील तोरंगण आणि सुर्यमाळ -आमला घाटात वातावरण भक्तीमय झाले असुन माऊलीच्या गजराने डोंग- दर्‍या दुमदुमल्या आहेत.

वारकरी दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे जात असताना खेडोपाडी आणि रस्त्यालगतच्या गावात मुक्काम करतात. शेकडो मैल प्रवास करुनही दमलेल्या या वारकर्‍यांच्या चेहर्‍यांवर थोडाही शीण जाणवत नाही व त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक मुक्कामी कीर्तन आणि भारूडाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाने सर्व वारकर्‍यांचा शीण नाहीसा होतो. यावेळी प्रत्येक गावागावांतुन दिंडीतील नाथभक्तांसाठी प्रितीभोजनाचे आयोजन केले जाते. सकाळी पुन्हा वारकरी थंडी, ऊन आणि वारा याची परवा न करता त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण करतात. एकूणच मोखाडा तालुक्यात यात्रोत्सवाच्या अगोदर पासूनच भक्तिमय वातावरण असते.

comments

About Rajtantra

Scroll To Top