दिनांक 06 April 2020 वेळ 4:32 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अतिवृष्टीतील बाधीत शेतकर्‍यांना कृषी विभागाने सोडले वार्‍यावर

अतिवृष्टीतील बाधीत शेतकर्‍यांना कृषी विभागाने सोडले वार्‍यावर

  • शेतकरी हवालदिल, अधिकारी संगदिल
  • शेतांचे नुकसान, अवास्तव पंचनामे, फसवी आकडेवारी

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 14 : तालुक्यात मागील पावसाळी हंगामात पावसाने तुंबळ धुमाकुळ घालीत शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केले आहे. यात शेतीच्या नुकसानी बरोबरच उपजाऊ भातशेतांचेही अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना शासनाकडून 8 हजार 600 रुपये एवढ्या तुटपुंज्या नुकसान भरपाईवरच शेतकर्‍यांची बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील हंगामात विस्कटलेल्या शेतांमधून भात पिकवायचा कसा? या विवंचनेत शेतकरी पडला आहे.

अतिवृष्टीमुळे संपुर्ण मोखाडा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतांच्या बांधांची प्रचंड प्रमाणात तुटफुट झालेली आहे. कृषी विभागाने 47.25 हेक्टर क्षेत्रावरील तुटफुटीचे पंचनामे केलेले आहेत व प्रतिहेक्टर 37 हजार 500 रुपये नुकसान भरपाईची मागणी नोंदवलेली आहे. यात दरहेक्टरी 400 रनिंग मीटर बांधांचे नुकसान ग्राह्य धरण्यात आलेले आहे. मात्र सरकारी कागदोपत्री दाखवलेली गेलेली ही तुटफुट वस्तुस्थिती निदर्शक नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार असल्याने तालुक्यातून नाराजीचा सूर निघत आहे.

त्यातच हेक्टरी 400 रनिंग मीटर प्रमाणे मिळणार्‍या 37 हजार 500 रुपये नुकसान भरपाईमध्ये केवळ 85 रुपये इतकी अत्यल्प मजुरी हातात पडणार असल्याने बांधांची दुरुस्ती करताना शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर शासनाने रोजगार हमीच्या मजुरीच्या तुलनेत दुरुस्तीची भरपाई निर्धारित करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. याबाबत मोखाडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रस्तुत माहिती मिळाली आहे. परंतु नुकसान भरपाईची तरतुद अद्याप झालेली नसल्याची माहिती देण्यात आली.

भात आणि नागली ही उपजीविकेची पिके असून नेमक्या याच शेतांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत दीनवाणी झालेली आहे. त्यातच तालुक्यात कुठेही नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी झालेली नसून कृषी विभागाचा एकही कर्मचारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर आलाच नसल्याची व कार्यालयात बसूनच नुकसानीचा ताळमेळ बसवण्याचा अजब मेळ कर्मचार्‍यांनी साधला असल्याची ओरड शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांना योग्य त्या भरपाईपासून वंचित रहावे लागणार आहे.

मोखाडा तालुक्यात 13 हजार 933 हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैकी 1 हजार 991 हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. त्यापैकी 47.25 हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त दाखविण्यात आले आहे. म्हणजेच एकूण क्षेत्राच्या केवळ 5% क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून दाखविण्यात आले आहे.

दरम्यान, बांधांच्या दुरुस्तीची तरतुद करणे सुलभ व्हावे म्हणून तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी नुकसान भरपाईसाठी आपले 7/12 आणि 8 अ आपल्या भागातील संबंधित कृषी सहाय्यकांकडे देण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top