दिनांक 26 May 2020 वेळ 5:13 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसरमधील दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार! -उद्योगमंत्री सुभाष देसाई

बोईसरमधील दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार! -उद्योगमंत्री सुभाष देसाई

मृतांचा आकडा आठवर

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एका रासायनिक कारखान्यात काल, शनिवारी भीषण स्फोट झाला. या घटनेत सात जण मृत्यूमुखी व 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर आज कंपनीच्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली एका बेपत्ता कामगाराचा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. दरम्यान, उद्योग मंत्री सुभाष देसाई व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज, रविवारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

बोईसर औद्योगिक वसाहतीतील ए.एन.के. फार्मासिटीकल्स या कंपनीत काल, सायंकाळी 6.30 ते 6.45 च्या सुमारास रासायनिक प्रक्रिया सुरु असताना भीषण स्फोट झाला. या घटनेत 8 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या आठपैकी एका कामगाराचा मृतदेह आज इमारतीच्या ढिगार्‍याखाली आढळून आला. तर कंपनीचे मालक नटू पटवर्धन या घटनेत गंभीर जखमी झाले असुन त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. इतर 7 जखमींवर एमआयडीसीतील तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरात त्याचे हादरे जाणवले. या स्फोटानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

आज उद्यागेमंत्री देसाई व पालकमंत्री भुसे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी खासदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास गजरे, तहसीलदार शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर पालकमंत्री भुसे यांनी येथील तुंगा रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. तसेच या घटनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सदर घटना अत्यंत दुर्दैवी असुन परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक व स्थानिक नागरिक मदत व बचाव कार्य करीत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जखमींवर शासकीय खर्चाने औषधोपचार करण्यात येतील व मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

तर या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या, सोमवारी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये औद्योगिक वसाहत व घातक कारखान्यांविषयी महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top