दिनांक 18 January 2020 वेळ 11:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा -जितेंद्र आव्हाड

पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा -जितेंद्र आव्हाड

  • सत्तेची झूल गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्याची केली टीका
  • जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात आव्हाडांची वाड्यात प्रचार रॅली व सभा

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : सत्तेची अंगावर असलेली झूल गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप अस्वस्थ झाले असल्याची टीका विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कुडूस येथील सभेमध्ये केली. तर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री भाजपचेच असताना देखील त्यांच्या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात पालघर जिल्ह्यातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काहीच हालचाली न झाल्याने जिल्हा विकासापासून दूर गेला असल्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन आव्हाड यांनी यावेळी केले.

आज वाड्यात आव्हाड यांच्या प्रचाररॅली व सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी डाकवली, कुडूस, खुपरी, अबिटघर, खानिवली आदी ठिकाणी प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी पालघर येथे झालेल्या सभेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसावे लागलेय असे म्हणत तीन पक्षांच्या आघाडी सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना आव्हाडांनी सत्ता गेल्याने फडणवीस अस्वस्थ असून वर्गाबाहेर बसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिल गेट्स यांनी इतिहास घडविला. फडणवीस कधीपासून मेरिटची चिंता करु लागलेत. चौथीपास वसंतदादांनी जो सहकाराचा पाया रचला त्यावर आज महाराष्ट्र उभा आहे. आता वर्गात पहिले आले असले तरी त्यांनी आता पुढील शिक्षणात प्रगती करावी. सत्ता गेल्याचे त्यांच्या पचनी पडले नसल्याने ते अस्वस्थ असल्याची टीका आव्हाड यांनी केली.

या भागातील समस्यांचा पाढा वाचताना सर्वात मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे वाढणारी बेरोजगारी असुन ती दूर करून त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी येथील घरघर लागलेल्या कारखानदारीला नवसंजीवनी देऊन नवीन उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही आव्हाड यांनी यावेळी दिले. जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, कुडूसचे उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव, आदींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी राष्ट्रवादीच्या रेखाताई पष्टे, काँग्रेसचे मुस्तफा मेमन, इरफान सुुुसे, रामदास जाधव, राष्ट्रवादीचे सुरेश पवार, निखिल पष्टे, तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, दिपक भोईर, अमीन सिंधू, काँग्रेसचे मुदस्सर पटेल, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे महेंद्र ठाकरे, अ‍ॅड. विवेक ठाकरे, आदी उपस्थित होते.

दरम्यान केंद्र सरकारने यावर्षी प्रजासत्ताक दिनी होणार्‍या संचलनात महाराष्ट्र व बंगाल सारख्या काही राज्यांचे चित्ररथ नाकारल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यावर प्रतिक्रिया देताना देशाच्या सर्वोच्चपदी बसलेले पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे कोणत्या मनोवृत्तीचे आहेत? असा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकार महाराष्ट्राशी आकसाने वागत असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व समाजसुधारणेत महाराष्ट्र व बंगालचे सर्वाधिक योगदान आहे. असे असताना महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारी जनता त्यांना धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top