दिनांक 18 January 2020 वेळ 11:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विक्रमगड : गावठी बॉम्ब हल्ले करणार्‍या माथेफिरुला अटक

विक्रमगड : गावठी बॉम्ब हल्ले करणार्‍या माथेफिरुला अटक

पालघर एटीएस व बॉम्ब शोधक पथकाची कारवाई

विक्रमगड, दि. 31 : जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसह शेजार्‍यांवर बॉम्ब हल्ले करुन दहशत माजवणार्‍या एका माथेफिरुला पालघर दहशतवाद विरोधी कक्ष (एटीएस) व बॉम्ब शोधक पथकाने सापळा रचून अटक केली आहे. संतोष यशवंत शेंडे (वय 37) असे सदर आरोपीचे नाव असुन याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

विक्रमगड तालुक्यातील खोस्ते शेंडेपाडा येथे राहणार्‍या संतोष शेंडे याचा काही महिन्यांपुर्वी घटस्फोट झाला असुन घटस्फोटानंतर त्याच्या पत्नीने पोटगीवरुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात त्याच्याच गावातील नारायण लक्ष्मण बेंडगा हे जामिनदार होते. मात्र शेंडे कोर्टाने दिलेल्या तारखेला नेहमीच गैरहजर राहत असल्याने बेंडगा यांनी न्यायालयातून जामिनदारपत्र काढून घेतल्याने याचा राग मनात धरुन संतोष शेंडेने त्यांच्यावर 12 डिसेंबर रोजी कोयत्याने वार करुन जीवघेणा हल्ला केला होता. यानंतर आरोपी शेंडेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्याने घरातूनच पोलिसांवर बॉम्ब हल्ले केले. तसेच त्याच्या घराशेजारी कोणीही दिसल्यास त्यांच्यावर तो दरवाजा व खिडक्यांमधुन बॉम्बहल्ले करु लागला होता. त्याच्या या धोकादायक वृत्तीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर आज, मंगळवारी (दि.31) सकाळी 6.50 वाजेच्या सुमारास पालघर एटीएस व बॉम्ब शोधक पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत सापळा रचून संतोष शेंडेला अटक केली. त्याच्याविरोधात विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top