दिनांक 18 January 2020 वेळ 12:35 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोर : अज्ञाताने केलेल्या गोळीबारात प्रॉपर्टी डीलर थोडक्यात बचावला

मनोर : अज्ञाताने केलेल्या गोळीबारात प्रॉपर्टी डीलर थोडक्यात बचावला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर-टेन गावच्या हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका कारवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली असून कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे कारच्या मागील सीटच्या काचेवर गोळी लागल्याने तो बचावला आहे. या प्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई येथील रहिवासी सुजित पाटकर हे बुधवारी (दि. 11) पालघर येथील धर्मेश गांधी व विकास पाटील यांच्याकडे सदनिका खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आले होते. या व्यवहारानंतर संध्याकाळी ते आपल्या एम.एच. 48/एस. 6651 या क्रमांकाच्या कारमधुन मुंबईच्या दिशेने परतत असताना महामार्गावरील टेन गावच्या हद्दीतील वेगास हॉटेल समोर हेल्मेट घालून असलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यानुसार पाटकर यांनी गाडी थांबवल्यानंतर सदर इसम खिश्यातून बंदूक काढत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच पाटकर यांनी गाडी पुढे नेली व त्याचवेळी दुचाकीस्वाराने रिवाल्वरमधून गोळी झाडली. त्यामुळे गाडीच्या मागील सीटच्या काचेला गोळी लागल्याने पाटकर यातून बचावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सुजित पाटकर हे व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आणि गुंतवणूकदार असल्याचे समजले असुन यापुर्वीही त्यांच्यावर मुंबईत असे हल्ले करण्याचा प्रयत्न झाल्याचे माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top