दिनांक 18 January 2020 वेळ 11:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » परुळेकर महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना पंचायत राज व्यवस्थेसंदर्भात धडे

परुळेकर महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना पंचायत राज व्यवस्थेसंदर्भात धडे

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 11 : तलासरीतील कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या वतीने आज, बुधवारी पंचायत राज व्यवस्थेतील नेतृत्व गुण विकास संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत आपल्या मनोगतातून या कार्यशाळेबद्दलचा हेतू स्पष्ट केला. तसेच पंचायत राज योजनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवक युवतींनी या व्यवस्थेचा भाग बनून सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन केले.

कार्यशाळेचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सामान्य कार्यकर्त्याचा आमदार कसा झालो; याबद्दलचे सर्व अनुभव कथन केले. तसेच पंचायत राज योजनेमुळे लोकशाही व्यवस्था कशी बळकट करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी ग्रामसभेतून गावाचा विकास करण्यासाठी युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे अनेक दाखले देऊन पटवून दिले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युवक युवतींनी स्वत:च्या विकासाबरोबरच गावाचा विकास करण्यासाठी सहभागी होऊन, एकूणच राष्ट्र विकास करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सुरेखा दळवी यांनी आदिवासी समाजासाठी असलेला पेसा कायदा किती महत्त्वाचा आहे हे सांगून या कायद्याची नीट अंमलबजावणी करण्यासाठी तरुणांनी या कायद्याचा अभ्यास करुन तो समजून घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. हा आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्त्वाचा कायदा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अल्लाउद्दीन शेख यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून विविध समित्यांचे महत्त्व सांगून रेशन व्यवस्था किती महत्त्वाची आहे. या व्यवस्थेत भ्रष्टाचार कसा होतो. तो कमी करण्यासाठी युवकांनी काय केले पाहिजे याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. तसेच पंचायत राज अभियाना संदर्भात गीतही सादर केले. साधना वैराळे यांनी डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या माध्यमातून पंचायत राज अभियान राबविण्यासाठी उभारलेल्या चळवळीचे अनुभव कथन केले. प्रमोद गोवारी या कार्यकर्त्यांने आपले अनुभव कथन करुन सरपंचाच्या माध्यमातून पंचायत राज योजनेमुळे गावाचा कसा विकास करता येतो हे सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष एल. एस. कोम यांनी यावेळी आपले राजकीय अनुभव सांगून तरुणांनी सर्व योजनांची माहिती करून घेतली पाहिजे व समाजाच्या सर्व थरांतील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. शेवटी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबद्दल आपला अभिप्राय नोंदविला आणि आम्ही नक्कीच समाजाच्या उन्नतीसाठी सर्व योजनांची माहिती करून देण्यासाठी सक्रिय राहू, अशी मते व्यक्त केली.

कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. आभार डॉ. शिखरे यांनी मानले तर सूत्र संचालन प्रा. गोतीस यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top