दिनांक 18 January 2020 वेळ 11:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अन्नदिनाचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर

अन्नदिनाचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर

  • शिक्षकांच्या उपस्थितीत धान्य वितरण करण्याला शिक्षकांचा विरोध
  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती

प्रतिनिधी/वाडा-कुडूस, दि. 8 : शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचविण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागाची असताना अन्नदिनाच्या नावाखाली जिल्ह्यातील शिक्षकांना या कामाला जुंपल्याने शिक्षकांमध्ये असंतोष असून याविरोधात शिक्षक सेनेच्या वतीने वाडा तहसिलदारांना शनिवारी (दि. 7) निवेदन देण्यात आले आहे.

अगोदरच शिक्षकांवर निवडणूकीची कामे, जनगणना, स्वच्छता अभियान राबविणे यांसारखी अनेक अशैक्षणिक कामे लादलेली असताना आता नव्याने जिल्हा पुरवठा विभागाने अन्नदिन साजरा करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविली आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला होणार्‍या या अन्नदिनी शिक्षकांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धान्याचं वाटप करावयाचे आहे. वाडा तालुक्यात सुमारे 185 रेशन दुकाने असून याकामी तालुक्यातील 185 शिक्षकांना आदेश देण्यात आलेत. खरंतर सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा विभाग व तालुका पुरवठा विभागाची आहे. वर्षानुवर्षे रास्त भाव दुकानदारांमार्फत धान्याचं वाटप केलं जातं. हे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचते की नाही याचे संपूर्ण नियंत्रण पुरवठा विभागाचे आहे. असे असतांना शिक्षकांना या कामी जुंपल्याने शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रत्येक गावातील रेशन दुकानात दरमहा सात तारखेला अन्नदिन साजरा करावयाचा असून सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी धान्य वाटप केले जाणार आहे. या दिवशी शिक्षकांनी आपली शाळा सोडून नियुक्ती दिलेल्या ठिकाणी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत थांबून हे धान्य वाटप करावयाचे आहे.

या कामासाठी अनेक महिला शिक्षकांना सुध्दा आपली शाळा सोडून दूरच्या गावांमध्ये नियुक्ती दिली गेली आहे. या कामामुळे काही ठिकाणी शिक्षक व रेशन दुकानदार यांच्यात वाद होण्याची देखील शक्यता आहे. आगोदरच शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असताना, या शाळाबाह्य कामासाठी आपले विद्यार्थी वार्‍यावर सोडून जावे लागणार असल्याने शिक्षक चिंतेत आहेत .

वास्तविक शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकांना जनगणना व निवडणुकी व्यतिरिक्त अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत, असे असताना हे काम लादल्याने शिक्षक सेनेने वाडा तहसीलदारांना आपल्या विरोधाचे निवेदन देऊन या शाळाबाह्य कामांवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती शिक्षक सेनेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष मनेश पाटील यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top