दिनांक 18 January 2020 वेळ 11:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » तलासरी : दरोड्यातील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा

तलासरी : दरोड्यातील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा

पालघर सत्र न्यायालयाचा निकाल

प्रतिनिधी/डहाणू, दि. 8 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी हद्दीत लघुशंकेसाठी गाडी थांबवलेल्या कारमधील प्रवाशांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर किंमती ऐवज लुटून पोबारा करणार्‍या दोन दरोडेखोरांना पालघर येथील सत्र न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

22 नोव्हेंबर 2014 रोजी यातील फिर्यादी व त्यांचे इतर 4 सहकारी आपल्या एम.एच.11/बी.ई. 700 या क्रमांकाच्या कारमधुन पुणे येथे निघाले होते. रात्री 1.15 वाजता त्यांची कार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी आरटीओ चेक पोस्टपासुन सुमारे 200 मीटर अंतर पुढे आल्यानंतर गाडीतील सर्वजण लघूशंकेसाठी कारमधून उतरले असता याच संधीचा फायदा घेत दोन अज्ञात दरोडेखोरांनी अचानक लोखंडी रॉड व बॅटरीच्या सहाय्याने सर्वांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम व चांदीच्या अंगठ्या असा ऐवज लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कसोशीने व शिताफीने तपास करत गंगाराम गोरखनाथ भदारगे व धर्मेश लक्ष्मण शेपटा या दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक जी. आर. आढाव यांनी याप्रकरणी अधिक तपास करत आरोपींविरोधात पालघर सत्र न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते.

हे प्रकरण न्यायालयापुढे सुनावणीसाठी आले असता फिर्यादी पक्षातर्फे महत्त्वाच्या पाच साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पुर्ण झाल्यानंतर सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवून 5 वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता डी. आर. तरे व कोर्ट कर्मचारी पोलीस हवालदार पी. सी. कराटे यांनी काम पाहिले.

comments

About Rajtantra

Scroll To Top