दिनांक 18 January 2020 वेळ 12:24 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आणखी एका आरोपीला कारावास

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आणखी एका आरोपीला कारावास

प्रतिनिधी/डहाणू, दि. 8 : अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग करुन अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पालघर येथील जिल्हा न्यायालयाने आणखी एका आरोपीला पोस्को (बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा) कायद्यांतर्गत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राजेश सना शिंगडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 15 दिवसांपुर्वीच अशाचप्रकारच्या गुन्ह्यातील अन्य एका आरोपीला न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च 2017 रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. डहाणू तालुक्यातील अस्वाली डोल्हार पाडा येथील रहिवाशी असलेल्या राजेश सना शिंगडा याने पीडित अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने अस्वाली जंगलात नेऊन आपल्या शेतातील झोपडीत जिवेठार मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अतिप्रसंग करुन अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले होते. पीडित मुलाने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर तिच्या फिर्यादीवरून याप्रकरणी घोलवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363,377,506 सह पोस्को कायद्याचे कलम 4 व 8 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली होती. दरम्यान, घोलवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बी. एस. गावीत यांनी या गुन्ह्याचा कसून तपास करुन आरोपीविरोधात सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

मागील काही दिवसांपासून न्यायालयापुढे या प्रकरणी सुनावणी सुरू होती. सरकारी पक्षातर्फे महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तसेच तोंडी व कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी आरोपीला गुन्ह्यात दोषी ठरवत पोस्को कायद्यांतर्गत 10 वर्ष सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास, तसेच भारतीय दंड विधान संहितेच्या 363 व 506 कलमांखाली प्रत्येकी 3 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महीने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता डी. आर. तरे व कोर्ट पैरवी व्ही. टी. पाटील यांनी काम पाहिले.

दरम्यान, बोईसर येथे 8 वर्षीय अल्पवयीन मुलाला आंबा देण्याचे आमिष दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 15 दिवसांपुर्वीच 7 वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजकिशोर माहत्तम भगत (वय 25) असे सदर आरोपीचे नाव आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top