दिनांक 18 January 2020 वेळ 12:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्वाची गरज; रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्वाची गरज; रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला असताना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे सर्वच राजकीय धुरिणांना अचंबित करणारे ठरले आहे. कोणताही महत्वाचा नेता पक्षात नसताना पक्षाने विक्रमगड व शहापूर विधानसभा मतदारसंघात चांगले यश मिळविल्याने पालघर जिल्ह्याला खंबीर नेतृत्व असते तर अधिक चांगले यश मिळवता आले असते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तर अशीच भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असुन पालघर जिल्ह्यात पक्षाला उभारी देण्यासाठी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची मागणी होत आहे.

2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने आता पुन्हा सत्ता येणार नाही या भीतीने जिल्ह्यातील विविध पक्षांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज पक्ष सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे जिल्ह्याला नेतृत्वच राहिले नव्हते. अशा परिस्थितीत रेखाताई पष्टे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाला नेतृत्व देत जिल्ह्यात पक्ष टिकविण्याचे काम केले. यात प्रामुख्याने रेखाताई पष्टेंनी आपल्या वयोमानाची तमा न बाळगता सातत्याने जिल्ह्याभर दौरे करून पक्ष संघटना टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या. पूर्वीच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं होतं. जिल्ह्यातील खडानखडा माहिती असल्याने पक्ष संकटात असताना व अनेक दिग्गज पक्ष सोडून गेले असताना रेखाताई पष्टेंनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेऊन जिल्ह्यासह राज्यात पक्ष संघटनेचे काम करून पक्ष संघटना बांधणी व सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यावर भर दिला. वाडा तालुक्याचा समावेश असलेल्या विक्रमगड व शहापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिध्द केलं आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याला खर्‍याअर्थाने खंबीर नेतृत्व मिळाले तर पक्ष अधिक उभारी घेऊ शकेल म्हणून रेखाताई पष्टेंना विधानपरिषद मिळावी यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते आग्रही असून पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी आपली मागणी बोलून दाखवली आहे.

पक्ष नेतृत्वाने ज्या उद्देशाने आमदार आनंद ठाकूरांना विधानपरिषदेची संधी दिली; ती फोल ठरली आहे. ठाकूर हे केवळ तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून मनाने मात्र भाजपमध्ये असल्याने जिल्ह्यातील पक्षाचे मोठे नुकसान झाले असा आरोप करत त्यांच्या आमदारकीचा पक्षाला कोणताच फायदा झाला नसल्याने जिल्ह्यात नेतृत्वाची उणीव भासू लागली आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा असल्याने येथील सहा पैकी चार विधानसभा अनूसुचित जमाती (एसटी) साठी राखीव आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ओबीसी व अन्य समाजाला लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी नसल्याने रेखाताई पष्टेंना विधानपरिषदेची संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, वाडा तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, माजी तालुकाध्यक्ष अशोक गव्हाळे, दीपक भोईर, माजी उपसभापती वैभव ठाकरे, विक्रमगड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, शहराध्यक्ष अमिन सेंदू, सुरेश पवार आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top