बोईसर-राणीशिगांव येथील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

0
80

11 जणांना अटक; सुमारे 57 हजारांचा मुद्देमाल जप्त

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : बोईसरमध्ये राजरोसपणे जुगार व सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू असून तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्याचे वेड लागल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा अड्ड्यांवर कारवाई करण्यात येत असुन मंगळवारी (दि.3) राणीशिगाव येथील सत्यनगर आदिवासी पाड्यावर सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारुन 11 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून 56 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बोईसरमध्ये औद्योगिक वसाहत असल्याने परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे बोईसर व आसपासच्या परिसरामध्ये स्थायिक झाले आहेत. परिणामी येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत असुन त्यानुसार गुन्हेगारी व अवैध धंद्यानाही पेव फुटले आहे. यात प्रामुख्याने जुगाराचा समावेश आहे. परप्रांतीयांची वस्ती असलेल्या शिवाजी नगर, गणेश नगर, भैय्यापाडा, दांडीपाडा, धनानी नगर यांसारख्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे सुरु आहेत. तर अशाचप्रकारे राणीशिगांव हद्दीतील सत्यनगर आदिवासी पाड्यातील वनविभागाच्या जागेत असलेल्या झाडे झुडपात सुरु असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केला असुन 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

चंदन रामेश्वर चौहाण (वय 36), साहील नन्हे कुरेशी (वय 20), गौतम रतनदेव यादव (वय 27), इस्माईल मोहिन मोहम्मदजहिद शेख (वय 19), फिरोज फकरेआलम अन्सारी (वय 25), रोशन देवेंद्रप्रसाद वर्मा (वय 24), सुभाष नारायण चौहाण (वय 32), हसमुक प्रेमजीभाई मेहता (वय 32), राजन मुन्नालाल शहा (वय 26), रानाभाई नानाभाई गडवी (वय 32) व आनंद रामहित सोनी (वय 25) असे सदर जुगार्‍यांची नावे असुन हे 11 जण दोन वेगवेगळे गट करुन तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली असुन अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments