दिनांक 18 January 2020 वेळ 11:57 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » भाजप वाडा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूकांची भाऊगर्दी

भाजप वाडा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूकांची भाऊगर्दी

प्रक्रिये बाहेरच्या सदस्याचीही वर्णी लागण्याची शक्यता

प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : भारतीय जनता पक्षाच्या वाडा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छूकांची भाऊगर्दी होत असून या पदासाठी सुरुवातीला 16 इच्छूक सदस्यांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला. परंतु दोन-अडीच तासांच्या चर्चेअंती तालुकाध्यक्ष पदाच्या या शर्यतीत सात सदस्य रिंगणात राहिले असून त्यांच्यामध्ये एकवाक्यता न झाल्याने तालुकाध्यक्ष पदाचा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार असल्याचे समजते.

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका दर तीन वर्षांनी होत असतात. वाडा तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया रविवारी (दि. 1) घेण्यात आली असून सुरुवातीला सोळा सदस्य तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र चर्चेअंती कुंदन पाटील, भरत पाटील, मंगेश पाटील, अशोक पाटील, दिलीप पाटील, भाई पाटील, रोहन पाटील हे सात सदस्य राहिले. तर या सातही सदस्यांमध्ये एकवाक्यता होऊ न शकल्याने ही निवड प्रक्रिया अपूर्ण राहिली. यानंतर दोन दिवसाच्या कालावधीत पुन्हा चर्चा करून एका इच्छूक सदस्याच्या नावावर एकमत न झाल्याने भाजपच्या निवड समितीने हा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेण्यात येईल, असे जाहीर केले.

भाजप वाडा तालुकाध्यक्ष पदाचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत होणे अपेक्षित असून उर्वरीत 7 सदस्यांमध्ये एकमत होत नसल्याने प्रक्रियेतील इच्छूक सदस्यांव्यतिरिक्त एखाद्या सदस्याची वर्णी तालुकाध्यक्ष पदी लागू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. वाडा तालुका भाजपमध्ये गटबाजी मोठ्याप्रमाणावर असल्याने एकमत होऊ शकलेले नाही. भाजपचे मूळ कार्यकर्ते व खासदार कपिल पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेला कार्यकर्त्यांचा गट यांच्यामध्ये अध्यक्षपदावरून चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली आहे. त्यामुळे दरवेळी सहमतीने होणारा अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय यावेळी वरिष्ठांकडे सोपविण्याचा प्रसंग ओढवला आहे. यानिमित्ताने वाडा तालुका भाजपमध्ये जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष पहावयास मिळत आहे. त्यामुळे गटबाजीतून निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी प्रक्रियेत भाग न घेतलेल्या एखाद्या कार्यकर्त्याची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान रविवारी झालेल्या निवड प्रक्रियेत निरीक्षक म्हणून बाबाजी काठोले, निवडणूक प्रमुख विनीत कोरे, सह प्रमुख प्रभाकर पाटील यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top