दिनांक 18 January 2020 वेळ 11:16 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा तालुका कृषी अधिकार्‍यांचा संगीत खुर्चीचा खेळ

मोखाडा तालुका कृषी अधिकार्‍यांचा संगीत खुर्चीचा खेळ

  • वर्षभरापासून सुरु आहे पदाचा गोंधळ
  • वरिष्ठांचा मनभाईसा कारभार
  • रोहयोच्या कामांना खोडा
  • कर्मचार्‍यांचे पगारही लांबले

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 4 : मोखाड्यातील तालुका कृषी अधिकारी पद मागील 1 वर्षांपासून रिक्त आहे. सद्यस्थितीत येथे प्रशासकीय व आर्थिक अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या देऊन 2 अधिकार्‍यांमार्फत कारभार चालविला जात आहे. त्यामुळे कोणाचाही पायपोस कोणाच्याच पायात राहिला नसल्याने रोहयोची कामे खोळंबली असून कर्मचार्‍यांचे पगारही लांबले आहेत.

अधिकार्‍यांची बेबंदशाही
येथे सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती क्रमप्राप्त असतानाही कनिष्ठ अधिकार्‍यांकडे कार्यभार सोपवण्यात येऊन ढकलगाडीसारखा कारभार चालविला जात आहे. आता तर मंडळ कृषी अधिकार्‍यांकडे असलेला पदभार काढून कृषी पर्यवेक्षकांकडे व अवघ्या आठवड्यात त्यांच्याकडूनही काढून घेऊन अर्धा जव्हार तालुका कृषी अधिकार्‍यांकडे तर अर्धा मोखाडा मंडळ कृषी अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे संगीत खुर्चीच्या या खेळात रोहयोच्या कामाला मोठ्या प्रमाणावर खोडा बसलेला आहे.

आले वरिष्ठांच्या मना
मे 2018 नंतर आजतागायत येथे मुळ नियुक्तीवरील सक्षम अधिकारीच नाही. दरम्यान कार्यालयीन मंडळ कृषी अधिकार्‍यांकडे तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र त्यानंतर वाडा उपविभागीय कृषी अधिकार्‍यांनी अचानक मंडळ कृषी अधिकार्‍यांकडील पदभार काढून कृषी पर्यवेक्षकांकडे देण्याचे फर्मान काढून चालत्या गाडीला खिळ घातली आहे. आता परत कृषी पर्यवेक्षकांकडून जव्हार तालुका कृषी अधिकारी (आर्थिक बाब) व मोखाडा मंडळ कृषी अधिकारी (प्रशासकीय बाब) असा विभागून पदभार सोपविण्यात आला आहे. अशा प्रकारे वरिष्ठांचा मनमानी कारभार सुरू असल्याने विकास कामांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. त्याशिवाय कर्मचार्‍यांचे पगार खोळंबल्याने नाराजीचा सुर निघत आहे.

मांजराचा होतो खेळ
एकीकडे मोखाड्यातील स्थलांतर, कुपोषण, वेठबिगारी आणि प्रामुख्याने झालेले शेतीचे नुकसान असे शेतकर्‍यांच्या आणि मजुरांच्या जनजीवनाशी निगडीत प्रश्न आ वासून उभे असताना अधिकारी वर्ग मात्र मनमानीपणे तालुका कृषी अधिकारी पदावर संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात मश्गुल असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई बरोबरच विकास कामे आणि कर्मचार्‍यांचे पगार खोळंबल्याचे पहायला मिळत आहे.

याबाबत उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असता सरकारी काम असल्याने असे निर्णय घ्यावे लागत असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रविण गवांदे यांनी स्पष्ट केले आहे.

तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने प्रचंड धुमाकूळ घालत शेतीचे बेसुमार नुकसान केले आहे. तर मजूर वर्गही रोजगाराअभावी मोठ्या प्रमाणावर विस्थापित झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई आणि मजुरांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी घेण्याऐवजी अधिकारीच बेबंदशाही करीत असल्याने याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी व्यापक जन आंदोलन छेडण्याचा इशारा खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी दिला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top