वाडा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी शासनाकडून 1.92 कोटींची मदत

0
17
  • तुटपुंजी मदत देऊन जखमेवर मीठ चोळण्याचा शासनाचा प्रयत्न; शेतकर्‍यांचा आरोप
  • हजारो शेतकरी मदतीपासून वंचितच
संग्रहीत छायाचित्र

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : वाडा तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍याच्या हातून हिरावला आहे. या ओल्या दुष्काळानंतर हताश झालेले तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाकडे मदतीसाठी डोळे लावून बसले होते. त्यानुसार शासनाने 1 कोटी 92 लाखाची मदत जाहीर केली आहे. मात्र शासनाने ही तुटपुंजी मदत देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

यंदा अवकाळी पावसाने तालुक्यातील जवळपास 21 हजार 312 शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून यासाठी राज्यपालांनी हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार शासनाकडून तालुक्यासाठी 1 कोटी 92 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असुन या रकमेचा तालुक्यातील केवळ 5 हजार 348 शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. तर उर्वरित हजारो शेतकर्‍यांना शासनाकडून पुन्हा मदतीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले.

तालुक्यातील 21 हजार 312 एवढे शेतकरी बाधित असून 5 हजार 685 विमाधारक शेतकरी आहेत. उर्वरित 15 हजार 627 शेतकार्‍यांपैकी 5 हजार 348 शेतकर्‍यांना शासनाकडून आलेली तुटपुंजी रक्कम अदा करण्यात येणार आहे. तर 10 हजार 279 शेतकरी मदतीपासून वंचितच राहणार आहेत. तरी शासनाकडून लवकरात लवकर भरीव निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी शेतकार्‍यांकडून केली जात आहे.

Print Friendly, PDF & Email

comments