सुर्या नदीवरील पुलाचे 5 वर्षात केवळ 70 टक्के काम!

0
19

जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास

वार्ताहर/बोईसर, दि. 3 : बोईसर शहराला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार्‍या व येथील औद्योगिक वसाहतीमुळे दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असणार्‍या बोईसर-चिल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या रस्त्यावरील सुर्या नदीवरील पुल अतिशय जीर्ण झाल्याने जुन्या पुलालगतच नवा पुल बांधण्यात येत आहे. मात्र जुन्या पुलाची अवस्था बिकट असल्याने लवकरात लवकर नविन पुलाचे काम पुर्ण होणे अपेक्षित असताना मागील पाच वर्षांत केवळ 70 टक्केच काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

बोईसर-चिल्हार रस्त्यावरील सूर्या नदीवर 1970 च्या दशकात हा पूल बांधण्यात होता आणि त्याच दशकामध्ये जगातील सर्वात मोठे तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्र त्याचप्रमाणे तारापुर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीसाठी लागणार्‍या मालाची वाहतूक याच पुलावरून करण्यात आली. आज या पुलाला सुमारे 50 वर्ष होत आल्याने पुलाची अवस्था अतिशय जीर्ण झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बोईसर चिल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम 2014 साली हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत सूर्या नदीवर एकमेकांलगत दोन स्वतंत्र पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असुन 36 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र नदीच्या पात्रात सबस्ट्ररचे (बांधणी) काम करण्यास नदीमधील पाण्याच्या पातळीमुळे मर्यादा आल्या आहेत. तसेच पुलालगतच्या खासगी जागांचे अधिग्रहण करण्यास अडचणी आल्याने हे काम होण्यास विलंब झाला, असे संबंधित अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. एमआयडीसीने संबंधित ठेकेदाराला मे 2019 पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. मात्र तरीही पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.

सध्या वाहतूक सुरु असलेला जुना पूल अतिशय जीर्ण झाला असला तरी दररोज या मार्गावर येणार्‍या-जाणार्‍या 20 ते 25 हजार लहान-मोठ्या तसेच मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांना या टोकाकडून त्या टोकाकडे नेण्याचं काम करत आहे. या पूलाचा बाजूचा कठडा देखील जीर्ण झाला असून या पुलावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री पुलासारखी घडना तर घडणार नाही ना अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे या पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अजूनपर्यंत या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नसल्याचे दिसून येत आहे.

29 कोटीच्या निधीतून या दोन्ही नवील पुलांचे काम सुरु असुन 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर 2020 मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती एमआयडीसीचे अभियंता एम. एस. लांजेवार यांनी दिली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments