दिनांक 30 May 2020 वेळ 7:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यात एचआयव्हीचे प्रमाण घटले!

पालघर जिल्ह्यात एचआयव्हीचे प्रमाण घटले!

आपण बदल घडवू शकतो ही थिम एचआयव्ही ग्रस्त रूग्णाच्या आयुष्यात बदल घडवेल! -जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर दि. 2 : जिल्ह्यामध्ये गेल्यावर्षी 0.27 टक्के एचआयव्ही रूग्ण आढळून आले होते. हे प्रमाण यंदा कमी होऊन 0.22 टक्क्यांवर वर पोहोचले असून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यासाठी ही बाब आशादायक असुन जागतिक एड्स दिन 2019 ची आपण बदल घडवू शकतो ही थिम असून ही थिम एचआयव्ही ग्रस्थांच्या आयुष्यात बदल घडवेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्स्क कार्यालय येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे बोलत होते.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे जिल्हा स्तरावर जनजागृतीकरिता सोशल मिडिया (व्हॉट्स अ‍ॅप, युट्युब) सारख्या माध्यमातून एचआयव्ही एड्स जनजागृतीपर व्हिडीओ-आडीओ क्लिप व इतर माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युवा वर्ग हा सृजनशील असल्यामुळे जनजागृतीच्या माध्यमातून बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी प्रभात फेरी, एचआयव्ही तपासणीचे महत्व, तसेच ए.आर.टी औषधोपचाराचे फायदे यासारख्या विषयांवर रांगोळी, पोस्टर व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स विषयी मुलभूत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्हीचा प्रतिबंध अशा अनेक विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील महाविद्यालामध्ये एकूण 13 रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून तसेच एनएसएसच्या माध्यमातून देखील एचआयव्ही/एड्सबद्दल जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जात आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 12 आयसीटीसी (समुपदेशन केंद्र),47 प्राथमिक उपकेंद्र, 4 टी आय एन्जिओ, 3 लिंक ए.आर.टी सेंटर, 1 सुरक्षा क्लिनिक व 4 खाजगी रुग्णालयात सुरु करण्यात आलेली चाचणी केंद्र कार्यरत असून या सुविधांमार्फत मोफत एचआयव्ही तपासणी व समुपदेशन केले जाते. तसेच सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते व रुग्णांना मोफत उपचार देखील उपलब्ध करून दिले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या नवीन ध्येयानुसार 90:90:90 हा कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. त्यानुसार 90 टक्के एचआयव्ही बाधित लोकांना स्वतःच्या स्थितीची कल्पना असणे तसेच यापैकी 90 टक्के लोकांना पुढील उपचार व सुविधांकरिता संदर्भित करणे व त्यापैकी 90 टक्के लोकांचा विषाणू भार नियंत्रणात आणून त्याचे आर्युमान वाढले पाहिजे हे उद्दिष्टे आहेत. हे उद्दिष्ट समोर ठेऊनच जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे काम चालू असून मागील 6 वर्षा (ऑगस्ट 2014) पासून (ऑक्टोबर 2019) पर्यंत एकूण एचआयव्ही समुपदेशन व चाचणी संख्या 3 लाख 65 हजार 812 एवढी असून त्यापैकी एकुण एचआयव्ही बाधितांची संख्या 1 हजार 576 एवढी आहे. हे प्रमाण सन 2014-15 मध्ये 0.94 टक्के होते ते आता 0.22 टक्के इतके झाले आहे. तसेच एकूण एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केलेल्या गरोदर मतांची संख्या 3 लाख 54 हजार 826 एवढी असून त्यापैकी एकुण एचआयव्ही बाधितांची संख्या 182 एवढी आहे. हे प्रमाण 14-15 मध्ये 0.11 टक्के होते. ते आता 0.3 टक्के इतके कमी झाले आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, ही प्रभात फेरी ग्रामीण रुग्णालय पालघर येथून हुतात्मा स्मारक, रेल्वे स्टेशन, माहीम रोड, आर्यन हायस्कूल, भगिनी समाज शाळा व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय या मार्गाने काढण्यात आली. ग्रामीण रुग्णालय येथे प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला.

यावेळी जिल्हा न्यायाधीश श्री. केळुस्कर व स्काउट गाईडचे जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र नाईक यांच्यासह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र केळकर, पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावित, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खंदारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, निवासी आरोग्य अधिकारी तथा बाह्य संपर्क अधिकारी तसेच नवोदय विद्यालय, दांडेकर कॉलेज व चाफेकर कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पालघर जिल्ह्यातील सर्व आयसीटीसी कर्मचारी, शेड एनजीओ व सखी चारचौघी या एनजीओंचे प्रतिनिधी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top