दिनांक 25 May 2020 वेळ 1:29 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » के. एल. पोंदा हायस्कूलचा 94 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न!

के. एल. पोंदा हायस्कूलचा 94 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 2 : दि डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के एल पोंदा हायस्कूल, एन. एल. अढिया मिडल स्कुल व श्रीमती कमलाबेन त्रिभुवन अढिया कन्यामंदिरचा 94 वा वर्धापनदिन व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. सचिव प्रदीप कर्णावट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पनवेलच्या उद्योजिका व शाळेच्या माजी विद्यार्थीनी सुनंदा कोठारी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच मुख्याध्यापक मदनकुमार ताजने, विश्वस्त राजेंद्र केळकर, अजय बाफना, सुनील पोंदा, डॉ. रोहित भन्साळी, सुधीर कामत, उपप्राचार्य सोपान इंगळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका साधना गोर्‍हे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम. जी. ताजणे यांनी प्रास्ताविक करताना सर्व पाहुण्यांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम, देण्यात येणार्‍या सोई, शैक्षणिक क्षेत्रात संस्थेला मिळालेले यश याबाबतचा वार्षिक अहवाल सादर करताना आढावा घेतला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुण्या कोठारी यांनी सांगितले की, उद्योजिका म्हणून नावारूपाला येण्याचे बीज या शाळेत रोवले गेले. शाळेतील त्यावेळचे शिक्षक व पालकांनी केलेले संस्कार, कठोर परिश्रम यामुळे आज मी उद्योजिका म्हणून आपल्यात उपस्थित आहे. नोकरी किंवा व्यवसाय करताना कुटूंबाची साथही तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे घरातील आपले सगळे वाद बाजूला ठेवून कुटूंबातील प्रत्येकाला मानाने व आनंदाने ठेवले तरच मिळविलेल्या यशाचा खरा आनंद घेता येतो यावर त्यांनी विशेष भर दिला. बाफना कुटुंबाने डहाणूतील शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांचे संस्कार, शाळेचे व शिक्षकांचे योगदान अविस्मरणीय आहे. उमेदीच्या काळात स्वयंसेवी संस्थांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अनाथांचे दुःख पाहून मन व्यथित झाले व त्यामुळेच महिलांना रोजगार निर्मितीचा संकल्प करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला, असे सांगतानाच मृदू बोलणे व समाजाचे हित लक्षात घेऊन कार्य केल्यास यश निश्चितच मिळते, असे कोठारी म्हणाल्या. मुलींनी कुटुंबाला आर्थिक मदत केल्यास त्या कुटुंबात समृद्धी येते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रमुख वक्ते डॉ. प्रा. भास्कर बडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, मुलींनी स्वतःला कमी लेखू नये. इतिहास आणि विज्ञानाचे प्रश्न विचारणार्‍यांनीच जगात कर्तृत्व गाजवले आहे. आपले आई बाबा हेच आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ नायक आहेत; त्यांचा सन्मान करावा. चांगल्या शिक्षकांमुळे आपण घडतो. जन्म देणारी माता आणि सावित्रीबाई फुले या दोन महिला आपल्या माता आहेत. जिद्द असेल तर यशप्राप्ती होतेच, असा मंत्र सांगून आम्ही बी घडलो, तुमी बी घडाना ही कविता सादर करुन त्याद्वारे शिक्षण व कठोर मेहनतीचे महत्त्व बडे यांनी विशद केले. अभ्यास करताना मन एकाग्र असावे. यशासाठी शॉर्टकट नको, मेहनतीने अभ्यास करूनच यशप्राप्तीचा खरा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

मागील वर्षी शाळेतील विशेष प्राविण्यासह यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दुसर्‍या सत्रात शालेय विद्यार्थ्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. प्लास्टिक मुक्तीसाठी सादर केलेल्या नाट्यछटेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

उपमुख्याध्यापक रवींद्र बागेसर यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा तांडेल व आनंद जाधव यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top