बोईसर : 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला 7 वर्षांची शिक्षा

0
12

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 25 : 8 वर्षीय अल्पवयीन मुलाला आंबा देण्याचे आमिष दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 7 वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजकिशोर माहत्तम भगत (वय 25) असे सदर आरोपीचे नाव आहे.

पाच वर्षांपुर्वी 3 मे 2014 रोजी ही घटना घडली होती. बोईसर रेल्वेस्टेशनच्या पुर्व भागात राहणारा पीडित 8 वर्षीय मुलगा रेल्वे स्टेशनपासुन काही अंतरावर शौचालयाला गेला असता, त्याला एकट्याला पाहून राजकिशोर भगत याने त्याला आंबा देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेले व तेथे त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले होते. ही बाब पीडित मुलाच्या कुटूंबियांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत बोईसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी राजकिशोर भगत याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 377 सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधि.2012 चे कलम 3, 4 नुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरिक्षक एस.के. पोटे यांनी याप्रकरणी अधिक तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात सबळ पुराव्यांसहित दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण न्यायालयासमोर सुनावणीकरीता आल्यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी राजकिशोर भगत याला या गुन्ह्यात दोषी ठरवत त्याला 7 वर्षे कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील दिपक तरे यांनी काम पाहिले.

Print Friendly, PDF & Email

comments