एकलव्य स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धांमध्ये घवघवीत यश

0
1

43 सुवर्ण, 7 रौप्य तर 2 कांस्य पदक पटकावले

प्रतिनिधी/डहाणू, दि. 24 : महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक संचलित राज्यातील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या सन 2019-20 साठीच्या 14 व 19 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय मैदानी स्पर्धांचे 19 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्यस्तरीय अथेलेटीक्स स्पर्धेमध्ये पालघर तालुक्यातील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल कांबळगांवच्या 43 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, 7 विद्यार्थ्यांनी रौप्य तर 2 विद्यार्थ्यांनी कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेत एकूण 26 शाळांनी सहभाग नोंदवला होता. नाशिकच्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते विजेत्यांना पदकं प्रदान करण्यात आली. दरम्यान चिखलदरा येथे झालेल्या 19 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची भोपाळ (मध्यप्रदेश) येथे 6 ते 16 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या क्रिडा शिक्षीका संध्या वाघमारे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांमधील उपजत कलागुण व कौशल्याची योग्य ती पारख करुन संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाते. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी रोज 4 तास कसून सराव केला होता. त्याचबरोबर संस्था सर्वतोपरी विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिल्याने विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे वाघमारे म्हणाल्या. या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे आदिवासी भागातील इतर खेळाडूंचे आत्मबळ वाढून विविध क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या खेळाडूंचे विशेष कौतुक करुन त्यांना मार्गदर्शनपर अनुभवाचे दोन शब्द बोलून प्रोत्साहन दिल्याची माहिती देखील वाघमारे यांनी यावेळी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments