दिनांक 21 February 2020 वेळ 12:41 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसई : ओला कॅब चालकाला लुटणारी टोळी गजाआड

वसई : ओला कॅब चालकाला लुटणारी टोळी गजाआड

माणिकपूर पोलिसांची कारवाई

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 22 : ओला कॅबचालकाला निर्जणस्थळी गाडी नेण्यास भाग पाडून तिथे त्याला मारहाण करुन व शस्त्रांंचा धाक दाखवून गाडीसह मोबाईल व रोख रक्कम लुटून नेणार्‍या चार जणांच्या टोळीमधील दोघांना गजाआड करण्यात माणिकपुर पोलिसांना यश आले आहे. तसेच या आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील हस्तगत करण्यात आले आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापुर येथे राहणार्‍या सचिन जयराम हांगे (वय 28) या ओला कॅब चालकाला ओला अ‍ॅपद्वारे 26 ऑक्टोबर रोजी वसई ते वापी (गुजरात) असे भाडे मिळाले होते. त्यानुसार एम.एच.05/डि.के. 2240 या क्रमांकाची आपली अर्टिगा कार घेऊन हांगे वसईला पोहोचले व रात्री 11.30 च्या दरम्यान ते ठरल्याप्रमाणे वसई पश्‍चिमेतील अंबाडी नाका येथुन कॅब बुक करणार्‍या 4 जणांना घेऊन वापीच्या दिशेने निघाले. दोन वाजेच्या सुमारास वापीजवळ गाडी येताच चौघांपैकी एकाने आमची उत्तर प्रदेशला जाणारी गाडी वापी स्टेशनमधुन सुटली असुन आता आम्हाला सुरतला सोड असे हांगे यांना सांगितले. त्यामुळे हांगे यांनी सुरतच्या दिशेने प्रवास सुरु ठेवला. वापीपासुन 35 किमी पुढे आल्यानंतर या चौघा प्रवाश्यांनी लघवीचा बहाणा करुन हांगे यांना गाडी थांबवायला सांगितली. त्यानुसार हांगे यांनी गाडी थांबवताच चौघेही गाडीतून खाली उतरले व त्यांनी हांगे यांना जबरदस्तीने खाली उतरायला सांगितले. हांगे गाडीतून उतरताच काही कळण्याच्या आतच चौघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व यानंतर एकाने त्याच्याकडील गावठी कट्ट्याचा धाक दाखवून हांगे यांचा मोबाईल व 10 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. यानंतर हांगे यांना पुन्हा मागच्या सीटवर बसवून चौघांपैकी एकाने गाडीचा ताबा घेतला व सुमारे दोन तासांचा प्रवास केल्यानंतर गुजरात राज्यातील कर्जन टोल नाक्याच्या अलिकडे हांगे यांना गाडीतून उतरविण्यात आले व चौघे आरोपी गाडी घेऊन फरार झाले.

खिशात पैसे व जवळ मोबाईल नसल्याने हांगे कसेबसे वसईत पोहोचले व माणिकपूर पोलीस स्टेशनला त्यांनी याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत चार अज्ञात इसमांविरोधात दरोड्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी माणिकपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

सदर पथकाने या गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास करत पुखराज चेनाराम जानी (वय 19, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) व राकेशकुमार चंद्रभान बिश्नोई (वय 19, रा. वसई पश्‍चिम) अशा दोन आरोपींना गजाआड केले. अटक करण्यात आलेले हे दोन्ही आरोपी मुळचे राजस्थान राज्यातील जोधपूर येथील रहिवासी असुन त्यांच्या चौकशीनंतर जोधपूरमधील मंडलाकला येथून हांगे यांची कॅब हस्तगत करण्यात आली. तर या गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा देखील आरोपीच्या वसई येथील घरातून हस्तगत करण्यात आला.

दरम्यान, दोन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत असुन फरार असलेल्या त्यांच्या इतर दोन साथिदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या टोळीने यापुर्वी देखील अशाप्रकारे कुणाला लूटले आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top