दिनांक 08 December 2019 वेळ 9:03 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघरमध्ये अमली पदार्थांची विक्री सुरूच!

पालघरमध्ये अमली पदार्थांची विक्री सुरूच!

शाळकरी व महाविद्यालय विद्यार्थ्यांसह तरुण पिढी नशेच्या विळख्यात

संग्रहित छायाचित्र

वार्ताहर/बोईसर, दि. 22 : पालघर तालुक्यातील झोपडपट्टी व गजबजलेल्या वसाहतींमध्ये राजरोसपणे अमली पदार्थांची विक्री होत असून त्यावर नियंत्रण ठेवल्यास पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे तरुण पिढीसह शाळकरी, महाविद्यालय व विशेषत: अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असून अमली पदार्थ विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना पोलिसांचे छुपे संरक्षण मिळत असल्याचा आरोप होत आहेत.

बोईसर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे दांडी पाडा, तसेच पश्चिमेतील भैय्या पाडा व गणेश नगर जेथें परप्रांतीय नागरिकांची लोकसंख्या जास्त आहे; तिथे राजरोसपणे या अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समजते. विशेष म्हणजे या परिसरांतील शाळांमधील काही विद्यार्थी देखील अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे तसेच अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे नागरिक बोलत आहेत. बोईसर येथील काही कामगार वसाहतींमध्ये देखील अनेक प्रकारचे अमली पदार्थ सहजगत्या उपलब्ध होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पालघर पूर्वेकडील गांधीनगरमधील दुकानांमध्ये राजरोसपणे अमली पदार्थांची विक्री सुरु आहे. अलिकडेच पालघर रेल्वे स्टेशन आवारातील पडीक इमारतींमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या काही इसमांना पोलिसांनी पकडले होते. अशाप्रकारे इतर काही ठिकाणी पोलीस छापे टाकत असले तरी या बंदी असलेल्या वस्तूंच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. अमली पदार्थांसह अशा पदार्थांचे घटक असणारे मँगो गोळी व मँगो पावडर (चूर्ण) नामक वस्तू पालघरमध्ये सहज उपलब्ध होत असून लहान मुलांमार्फत या पदार्थांचे वितरण केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अशा वस्तू शहरातील अनेक पानटपर्‍या व रस्त्याच्या कडेला असलेल्या सिगरेट-तंबाखू वितरकांकडे उपलब्ध होत असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.

मँगो पावडरच्या 5-6 पुड्या खाल्ल्या की अमली पदार्थ्यांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे समाधान होते, असे सांगण्यात येते. या वस्तुवर प्रतिबंध नसल्याने मावा विक्रेत्यांकडे देखील या वस्तू उपलब्ध होत असल्याने याविरुद्ध फूड अँड ड्रग्स (अन्न व औषध) विभागाने कारवाई करावी, अशी स्थानिक पोलिसांची भूमिका आहे. तर अशा दुकानदारांकडून पोलिसांची मर्जी राखली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप होत आहेत.

भारतातील उत्तरेकडील प्रांतांतून हे अमली पदार्थ रेल्वे मार्गाने आणले जातात. गाडीतील शौचालयात किंवा शौचालयाच्या टाकीच्या भागात असे साठे पद्धतशीरपणे लपवून त्यांची वाहतूक केली जाते व त्यानंतर हे पदार्थ पालघर व बोईसर येथील काही गोडाऊनमध्ये उतरून त्यांचे वितरण केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. गांजा, अफू व इतर अमली पदार्थांची कागदाच्या पुड्यांमध्ये 20 ते 250 रुपये दराने विक्री केली जात असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी असे अमली पदार्थ विक्री करणार्‍या इसमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top