एमआयडीसीत दिवसाढवळ्या विषारी वायू सोडल्याने नागरीकांना बाधा

0
314

वार्ताहर/बोईसर, दि. 19 : तारापुर औद्योगिक परिसरातील डी झोनमध्ये येणार्‍या काही कंपन्यांनी आज दिवसा ढवळ्या हवेत विषारी वायू सोडल्याने या परिसरात वावरणार्‍या कामगार व नागरीकांना या विषारी वायूची बाधा झाली. डोळे जळजळणे, घसा खवखवणे तसेच श्वास घेण्यास अडथळा यांसारखा त्रास अनेकांना जाणवला.

तारापुर औद्योगिक परिसरात हजारो कारखाने कार्यरत असुन यापुर्वी देखील अनेकवेळा रात्रीच्या सुमारास कंपन्यांकडून विषारी वायू वातावरणात सोडल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र आता दिवसाढवळ्या देखील कंपन्याकडून विषारी वायू हवेत सोडले जात आहेत. सालवड ते चित्रालय दरम्यानच्या डी झोन परिसरातील निपुर, ओमेगा व आरती इंडस्ट्रीज या कंपन्यांमधुन आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हवेत विषारी वायू सोडल्याने या भागात वावरणार्‍या कामगार व नागरीकांना डोळ्यांना जळजळ, घशात खवखव, त्याचप्रमाणे श्वासनाला त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या.

दरम्यान, तारापूर एमआयडीसीत असे प्रकार नियमित घडत असल्याने व संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील नागरीक मुकाट्याने हे प्रदुषण पचवत आहे. तर याचाच फायदा घेत कारखानदार आता दिवसा-ढवळ्या वायू प्रदूषण करताना दिसत आहेत. एकुणच तारापूर एमआयडीसीतील वाढती प्रदुषणाची पातळी पाहता येथील नागरीकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments