दिनांक 04 July 2020 वेळ 12:59 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आशा, ए.एन.एम. व आरोग्य केंद्रांना विविध आरोग्य उपकरणांचे वाटप

आशा, ए.एन.एम. व आरोग्य केंद्रांना विविध आरोग्य उपकरणांचे वाटप

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 17 : मोखाड्यातील रुग्णांना गाव पातळीवरच आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आरोहन व सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आशा प्रकल्पांतर्गत आशा कार्यकर्त्या, ए.एन.एम. आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध आरोग्य उपकरणांचे वाटप विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सुनील भूसारा यांच्या हस्ते करण्यात आले. 14 नोव्हेंबर या बालदिनाचे औचित्य साधून या उपकरणांचे वाटप करण्यात आले.

आरोहन ही संस्था लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी मोखाडा, जव्हार, पालघर, डहाणू या तालुक्यामध्ये कार्यरत आहे. यासाठी आरोहनतर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. आता आरोग्य सुविधांमध्ये सुलभता यावी, सर्वसामान्य रुग्णांना व बालकांना गाव पातळीवर उपचार मिळावेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय येथे विविध तपासण्या करता याव्या व यातून रुग्णांच्या खर्चात कपात व्हावी या प्रयत्नातून सदर आरोग्य उपकरणांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या उपकरणांमुळे रक्त, लघवी, शरीरातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन इत्यादी तसेच आशा किटच्या माध्यमातून प्राथमिक तपासण्या गावपातळीवरच होणार आहे. परिणामी आजाराचे लवकर निदान होऊन उपचार करणे सोईचे होणार आहे.

मोखाडा तालुक्यातील 150 आशा कार्यकर्त्या, 32 ए.एन.एम. व 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांना हे आरोग्य उपकरणांचे किट वाटप करण्यात आले आहे. तर या आगोदरही जव्हार, मोखाडा व पालघर येथे सोनोग्राफी मशीन दिल्याने तब्बल 10 हजार गरोदर माता व रुग्णांची सोनोग्राफी झाली असून धोक्यांच्या मातांना संदर्भ सेवा मिळाल्या आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, सभापती प्रदीप वाघ, उप सभापती संगीता दिघा, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर देसले, डॉ. कुलकर्णी, आशा कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आरोहनचे प्रकल्प व्यवस्थापक नितेश मुकणे, कौस्तुभ घरत, प्रकल्प अधिकारी माधुरी मुकणे, गणेश सरोदे, वंदना मोर्या व आरोहन टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भालचंद्र साळवे यांनी तर प्रास्ताविक माधुरी मुकणे यांनी केले.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top