दिनांक 04 July 2020 वेळ 1:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड; शेतातील सडलेले पीक करताहेत गोळा

पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड; शेतातील सडलेले पीक करताहेत गोळा

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 17 : पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्टमध्ये मुसळधार, त्यानंतर परतीच्या आणि आता अवकाळी पावसाने संपुर्ण भातशेती नष्ट झाली आहे. त्यातही राज्यपालांनी हेक्टरी 8 हजार रूपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे, वर्षभर कशी गुजराण करायची या विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांनी शेतात सडलेले पीक गोळा करायला घेतले आहे. कुठे पायलीभर, तर कुठे पोतं – दोन पोतं धान्य मिळेल यासाठी शेतकर्‍यांची तडफड सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात केवळ खरिपाचेच ऐकमेव पीक घेतले जाते. तेही अवकाळी पावसाने हिरावुन घेतले आहे. त्यामुळे जेथे एका शेतात पाच ते दहा पोते धान्य पिकायचे; तेथे हाती दोन पोतेही धान्य लागणार नाही, अशी अवस्था शेतीची झाली आहे. गतसाली कोरड्या दुष्काळाने तर यावर्षी ओल्या दुष्काळाने शेतकर्‍यांना मारले आहे. या भागातील संपुर्ण शेती पावसावरच अवलंबून आहे. मात्र पावसाचा लहरीपणा सतत दोन वर्षांपासुन शेतकर्‍यांच्या बोडक्यावर बसला आहे. त्यामुळे यापुढे शेती करायची की नाही अशी भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे होऊनही त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यावेळी शासनाने 8 हजार 600 रूपये हेक्टरी मदत जाहीर केली होती. तर आता राज्यपालांनी 8 हजार रूपये हेक्टरी मदत जाहीर करून शेतकर्‍यांची क्रुर चेष्टाच केल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

मुळातच, खरिपाच्या शेतीसाठी मशागत, बियाणे, पेरणी, नांगरणी, लावणी, खत, निंदणी आणि मजुर यासाठी 25 ते 30 हजार रूपये एकरासाठी खर्च येतो. असे असताना शासनाने ऑगस्टमध्ये 8 हजार 600 तर आता राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांनी 8 हजार रूपये हेक्टरी मदत जाहीर केली. अर्थात शेतकर्‍यांना एकरी केवळ 3 हजार 200 रुपये मदत मिळणार आहे. त्यामुळे आता वर्षभर गुजराण कशी करायची? असा प्रश्‍न येथील आदिवासी शेतकर्‍यांना सतावत असुन पोटाची खळगी भरण्यासाठी तो शेतात सडलेलं धान्य गोळा करत आहे. पायलीभर धान्यासाठी त्याची ही केविलवाणी धडपड सुरू आहे.

जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न भेडसावणार!
पावसामुळे शेतातील धान्यासह पेंढाही काळा पडून सडला आहे. हाती धान्य तर लागणारच नाही; मात्र, पेंढाही सडल्याने जनावरांना वैरण कुठून आणायची? हा देखील मोठा प्रश्न बळीराजा समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे कर्ताऊ जनावरांचे डोळ्यादेखत मृत्यू पाहण्यापेक्षा, नाईलाजास्तव त्यांची विक्री करावी लागणार आहे.

आमच्या प्रत्येक शेतात दरवर्षी 5 ते 6 पोते भात पिकायचा. मात्र, या वर्षी एका शेतात पायली – पायली धान्य गोळा करायची वेळ आली आहे. त्यामुळे दोन पोतेही धान्य घरात येणार नाही. तेव्हा वर्षभर कसं जगायचं. पावसाच्या पाण्यात भिजून पेंढाही काळा पडल्याने जनावरांना खाण्यासही तो योग्य राहिलेला नाही. त्यामुळे जनावरांना वैरण कुठून आणायची हा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला आहे.
-तुळशी चंद्रकांत येडे, महिला शेतकरी, वावळ्याचीवाडी, मोखाडा

युती शासनाने ऑगस्टमध्ये 8 हजार 600 आणि आता राज्यपालांनी 8 हजार रूपये हेक्टरी मदत जाहीर करून शेतकर्‍यांची क्रुर चेष्टा केली आहे. शेतकर्‍यांचा एकरी 25 ते 30 हजार रूपये खर्च होतोय. आम्ही 50 हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. मात्र, ही तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळले गेले आहे.
-सुनिल भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top