दिनांक 08 December 2019 वेळ 9:01 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » खोडाळ्यातील आरोग्य सेवेविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

खोडाळ्यातील आरोग्य सेवेविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

  • वैद्यकीय अधिकार्‍यांची दोन्हीही पदे रिक्त
  • पशुवैद्यकीय दवाखान्याचीही परवड

प्रतिनिधी/मोखाडा, दि. १७ : मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही केंद्रस्थानी असलेली महत्त्वाची बाजारपेठ आहे. असे असतानाही येथील आरोग्य सेवा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. मागील 6 महिन्यांपासुन या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे वैद्यकिय अधिकार्‍याची त्वरित व कायमस्वरूपी नियुक्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खोडाळा ग्रामपंचायतीने दिला आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र विस्तारीत आहे. परिसरातील 28 खेड्यांसह नाशिक जिल्ह्यातील वैतरणा, देवगाव, टाके व श्रीघाट आदी परिसरातुनही रुग्णांचा ओघ या केंद्राकडे मोठ्या प्रमाणावर असतो. यामध्ये बाह्यरुग्ण 200 ते 250 च्या पटीत दररोज तपासले जात आहेत. तर आंतररुग्णांचा भरणाही लक्षणीय आहे. परंतु येथील श्रेणी 1 चे वैद्यकिय अधिकारी पद मागील तीन वर्षांपासून तर श्रेणी 2 चे पद 6 महिन्यांपासून रिक्त आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही आरोग्य विभाग याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरीकांचा आरोप आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन या ठिकाणी बर्‍याच वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली जात आहे. या मागणीला आजपर्यंत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उलट येथील रुग्णांना प्राथमिक सेवाही सुरळीत मिळत नसल्याने रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गटविकास अधिकारी नॉट रिचेबल

याबाबतची कार्यवाही आणि वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे – डहाळे यांचेशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. तर तालुका वैद्यकीय अधिकारी किशोर देसले यांच्याशी संपर्क साधला असता, सद्यस्थितीत येथे दररोज परिसरातील वैद्यकीय अधिकार्‍यांकडून तात्पुरत्या स्वरुपात सेवा दिली जात असून लवकरच येथील अडचण कायम स्वरुपी सोडविण्यासाठी उपाययोजना आखली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु अशा प्रकारचे मासलेवाईक उत्तर त्यांनी 2 महिन्यांपूर्वीही दिले होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या एकूण भूमिकेवर संदेह व्यक्त केला जात आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्याचीही परवडच आहे. याठिकाणी कोणताही कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे येथील दोन्ही आरोग्य सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आंदोलन छेडण्याचा मनोदय आहे व तसा पत्रव्यवहार केला आहे.
-प्रभाकर पाटील, सरपंच, खोडाळा

comments

About Rajtantra

Scroll To Top