दिनांक 08 December 2019 वेळ 10:41 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूत पार पडला ज्येष्ठांचा वाढदिवस सोहळा

डहाणूत पार पडला ज्येष्ठांचा वाढदिवस सोहळा

प्रतिनिधी/डहाणू, दि. 17 : डहाणू येथील जेष्ठ नागरिक संघातर्फे, प्रथे प्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सभासदांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा 16 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. आजच्या तरुणाई प्रमाणेच प्रत्येक जेष्ठ सभासदाला कौटुंबिक वाढदिवस सोहळ्याबरोबरच मित्रांच्या सहवासात वाढदिवस साजरा करण्याचा आनंद मिळावा म्हणून दर महिन्याला अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष रमेश शिर्के, उपाध्यक्ष मारुती वाघमारे, सचिव बापुराव देवकर, सहसचिव वसंत तांडेल, सह कोषाध्यक्ष विवेक नवघरे, सल्लागार भारत वागासकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रास्ताविक करताना देवकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद करुन आपल्या कार्यालयासाठी जागा मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे सांगून कोकण विभागीय संघाच्या कार्यकारणी सभेचा थोडक्यात वृतांत कथन केला. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असणार्‍या एकूण 14 सभासदांपैकी हजर असलेले सभासद प्रभाकर पाटील, हेमंत राऊत, शिरीष कोकीळ, श्रीमती विजया मीठे यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. विशेष बाब म्हणजे उत्सवमूर्तींपैकी प्रभाकर पाटील (वय 73) व श्रीमती विजया मीठे (वय 72) मोठ्या उत्साहाने व आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी उत्सव मूर्तींनी प्रसंगोचीत मनोगत व्यक्त केले. श्रीमती मीठे यांनी सादर केलेल्या एका विनोदी कवितेने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. इतर उपस्थित सभासदांनीही भावगीते, भक्तिगीते, भजन सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. उपाध्यक्ष मारुती वाघमारे यांनी हल्ली धावपळीच्या जीवनात जेष्ठ नागरिकांना भेडसावणार्‍या विविध समस्या व त्यावर सभासदांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच आपल्या जवळ असलेला पैसा स्वतःसाठी खर्च करून उर्वरित आयुष्य आनंदाने व्यतित करावे, यावर विशेष भर दिला. कार्यक्रमाला 25 ते 30 महिला व पुरुष सभासद उपस्थित होते.

शेवटी सहसचिव तांडेल यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहार व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

comments

About Rajtantra

Scroll To Top