ढवळे महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग

0
12

15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

वार्ताहर/बोईसर, दि. 18 : पालघर येथील डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथिक महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची वरिष्ठांकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला डॉक्टरने याबाबत पालघर पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर मानसिक छळ केल्याची तक्रार नोंदवली असुन त्यानुसार संबंधित 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

30 विद्यार्थीनी व एक विद्यार्थी अशा 31 जणांची नवीन तुकडी सहा दिवसांपूर्वी एम.डी. होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. एम. एल. ढवळे होमिओपॅथिक महाविद्यालयात दाखल झाली आहे. या तुकडीमधील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी 17 नोव्हेंबर रोजी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते. या फ्रेशर्स पार्टीचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे तसेच या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत गुरुवारी (दि. 14) रात्री हॉस्पिटलचे नित्याचे काम संपवून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पीडित प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने केली आहे. तसेच गेल्या काही दिवसात आपल्याला अपमास्पदरित्या वागवलं असल्याचंही तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

याबाबत महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद कापसे यांना विचारले असता, संबंधित महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वी महाविद्यालयातील कुठल्याही अधिकार्‍यांकडे आपली भूमिका किंवा तक्रार मांडली नाही. तसेच त्यांना भेटण्यासाठी गेलेले प्राचार्य व अँटी रॅगिंग सेलच्या अध्यक्षांशी बोलण्यासही नकार दिला, असे कापसे म्हणाले. या घटनेनबाबत पोलीस तपास सुरू असुन या कामी संस्थेकडून पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत चौकशीदरम्यान, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी संस्थेने संपर्क साधला असता, या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे रॅगिंग किंवा मानसिक छळ झाला नसल्याचे सर्व विद्यार्थ्यांनी एक मताने सांगितले आहे. तर या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचं अभद्र, अश्लील संभाषण किंवा कृती झाली नाही. तसेच ही बैठक हसत – खेळत झाली व त्यामध्ये फ्रेशर्स पार्टीचे चांगल्या पद्धतीने नियोजन झाले होते, असे नव्याने दाखल झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सांगितल्याचा दावाही डॉ. कापसे यांनी केला आहे. या प्रकरणी संस्थेकडून सखोल अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. ढवळे इन्स्टिट्यूट हे शासनाच्या रॅगिंग संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत असून रॅगिंग विषयाचे सर्व नियम संस्थेने आपल्या प्रवेश महितीपत्रकात नमूद केले आहेत व नवीन विद्यार्थ्यांना इंडकशनच्या प्रक्रियेदरम्यान या विषयाची सर्व माहिती व प्रक्रिया समजवून सांगण्यात आलेली आहे. आमच्या संस्थेच्या आवारात राहणार्‍या सर्व विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक सुरक्षिततेसाठी पुरेशी काळजी महाविद्यालय घेत आहे. संस्थेच्या इतिहासात अशी तक्रार होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे या तक्रारीची सखोल अंतर्गत तपासणी संस्था करीत आहे, असे डॉ. कापसे यांनी संगीतले.

दरम्यान, याप्रकरणी पालघर पोलिसांनी संबंधित 15 वरीष्ठ डॉक्टरांविरोधात रॅगिंग अधिनियम कलम चार अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु असल्याचे पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दशरथ पाटील यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments