दिनांक 04 July 2020 वेळ 1:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » भाजप पदाधिकार्‍यांकडून मोखाड्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

भाजप पदाधिकार्‍यांकडून मोखाड्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी आंदोलनाचा इशारा

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 15 : मुसळधार, परतीच्या आणि आता अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाजपच्या पालघर जिल्हा पदाधिकार्‍यांनी तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेतीची थेट बांधांवर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी यासाठी मोखाडा तहसीलदारांना निवेदन दिले. याबाबत लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकार्‍यांनी आज मोखाड्यातील अतिदुर्गम व शेवटचे टोक असलेल्या करोळ, वावळ्याचीवाडी, पाचघर तसेच खोडाळा येथील आदिवासी शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या. मुळातच या भागात खरीप हंगामा व्यतिरीक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने, येथील शेतकर्‍यांची उपासमार होणार आहे. त्यामुळे येथे तातडीने नरेगाची कामे सुरू करावीत. त्याचबरोबर पीककर्ज माफ करावे आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ. सवरा यांनी यावेळी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकार्‍यांची भेट घेऊन, मंत्रालय स्तरावर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी व त्यांचे पीककर्ज माफ व्हावे या आशयाचे निवेदन मोखाडा तहसीलदारांना देण्यात आले असुन याबाबत लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी भाजपचे पालघर उपाध्यक्ष संतोष चोथे, युवा मोर्चा विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष उमेश येलमामे, मोखाडा तालुकाध्यक्ष रघुविर डींगोरे, शहर अध्यक्ष विलास पाटील, आदिवासी विकास आघाडीचे मिलिंद झोले, देवराम कडु, नामदेव पाटील, युवा मोर्चाचे अनिल येलमामे, नरेश झोले, उमाकांत हमरे, पाघारे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top