दिनांक 04 July 2020 वेळ 12:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर : आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

पालघर : आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

कामाचा धनादेश देण्याकरीता कंत्राटदाराकडे केली होती लाचेची मागणी

पालघर, दि. 13 : आश्रमशाळा परिसरात पेव्हरब्लॉक बसवणार्‍या बांधकाम कंत्राटदाराला कामाच्या रक्कमेचा धनादेश देण्याकरीता त्याच्याकडून 10 हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या पालघर तालुक्यातील एंबुर-ऐरंबी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (पालघर कॅम्पने ही कारवाई केली.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराने एंबुर-ऐरंबी आश्रमशाळेच्या परिसरातील ध्वजस्तंभ व त्याच्यालगत पेव्हरब्लॉक बसविण्याचे कंत्राट घेतले होते. हे काम पुर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने ठरल्याप्रमाणे 65 हजार रुपयांची मागणी केली असता एंबुर-ऐरंबी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कुमार वामन पष्टे (वय 56) यांनी कामाच्या रक्कमेचा धनादेश देण्याकरीता त्याच्याकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार कंत्राटदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करुन आज, बुधवारी (दि. 13) संबंधित ठिकाणी सापळा रचला असता मुख्याध्यापक कुमार वामन पष्टे यांना रंगेहाथ 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील व अपर पोलीस अधीक्षक मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक कलगोंडा हेगाजे, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, पोलीस नाईक सुवारे, सुतार, पालवे, चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सुमडा, मांजरेकर व पोलीस शिपाई दोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांच्याकडील कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले असुन तक्रारीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे, कॅम्प पालघर

  • दुरध्वनी क्रं. 02525-297297
  • मोबा.क्रं.9552250404
  • टोल फ्रि क्रं. 1064
Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top