दिनांक 04 July 2020 वेळ 1:22 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जनजागृतीअभावी पालघर जिल्ह्यातील लाखो शेतकरी विम्यापासुन वंचित?

जनजागृतीअभावी पालघर जिल्ह्यातील लाखो शेतकरी विम्यापासुन वंचित?

केवळ 21 हजार शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शेतकर्‍यांना आधार ठरणार्‍या पिकविम्यापासुन मात्र जिल्ह्यातील लाखो शेतकरी वंचित असल्याची बाब पुढे आली असुन पीक विमा उतरवलेल्या केवळ 21 हजार 159 शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. तर उर्वरित शेतकर्‍यांना शासनाच्या मदतीची वाट पाहावी लागणार आहे.

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. मात्र यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबलेल्या पावसाने जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस व त्यात सोसाट्याच्या वार्‍यामुळे जिल्ह्यातील 100 टक्के शेतकर्‍यांचे काढणीला आलेले उभे पीक आडवे झाले. तर काढणी झालेले पीक कुजून गेले आहे. जर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी पिकविमा उतरवला असता तर त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. मात्र डहाणू तालुक्यातील 2 हजार 704, पालघर तालुक्यातील 3 हजार 477, जव्हार तालुक्यातील 3 हजार 427, मोखाडा तालुक्यातील 2 हजार 657, तलासरी तालुक्यातील 1 हजार 191, वाडा तालुक्यातील 5 हजार 643 शेतकरी, विक्रमगड तालुक्यातील 2 हजार 547 व वसई तालुक्यातील 513 अशा एकुण 21 हजार 159 शेतकर्‍यांनीच पीकविमा उतरवला असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच विमाकंपन्यांकडून विमा उतरविलेल्या सुमारे 75 टक्के शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे झाल्याचे समजते.

अर्थात जिल्ह्यात पुरेश्या जनजागृतीअभावी लाखो शेतकरी पिकविम्यापासुन वंचित राहिल्याचा अंदाज असुन अशा शेतकर्‍यांना आता शासनाकडून मिळणार्‍या नुकसान भरपाईची वाट पाहावी लागणार आहे.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top