दिनांक 12 December 2019 वेळ 10:10 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डॉ. नेहाच्या बळीनंतर बांधकाम विभागाला जाग

डॉ. नेहाच्या बळीनंतर बांधकाम विभागाला जाग

  • भिवंडी वाडा मनोर महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार
  • 600 कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रस्ताव सादर करणार

प्रतिनिधी/कुडूस, दि. 11 : भिवंडी वाडा मनोर हा महामार्ग बांधकाम केल्यापासून खड्ड्यातच आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा निवेदने देऊन व रास्तारोकोसह इतर प्रकारे आंदालने करुन देखील तात्पुरती मलमट्टी सोडल्यास आवश्यक त्या दुरुस्तीकडे ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसुन आले. मात्र अलीकडेच डॉ. नेहा शेख या 23 वर्षीय युवतीचा याच मार्गावर अपघाती मृत्यू झाला व ही घटना मंत्रालयीन स्तरावर जाऊन धडकल्याने या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचा बांधकाम खात्याकडून विचार केला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

भिवंडी वाडा मनोर या महामार्गाची अवघ्या सहा वर्षात दुरावस्था झाली आहे. 64 किमी लांबीच्या या महामार्गावर खड्ड्यांमुळे हजारो निष्पाप बळी गेल्याने लोकांच्या मनात मोठा उद्रेक झाला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरीकांसह विविध संघटना व राजकीय पक्षांकडून रास्तारोकोसह इतर अनेक आंदोलने केली गेली. मात्र त्यांची दखल घ्यावी, असे कुणालाच वाटले नाही. या रस्त्याची ठेकेदार कंपनी असलेल्या सुप्रीम कंपनीने दोन टोल नाके उभारुन वाहनचालकांकडून कोट्यावधी रुपयांची वसुली केली. मात्र रस्त्याचा दर्जा सुधारण्याकडे कंपनीचा कोणताही प्रयत्न दिसला नाही. मात्र गेल्या महिन्यात कुडूस येथील 23 वर्षीय युवती डॉ. नेहा शेख हीचा याच मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला व या घटनेमुळे संतापलेल्या लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. तेव्हा ही बातमी मंत्रालय स्तरावर गेल्यावर या रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीचे काम बांधकाम खात्याकडे देण्यात आल्याची माहिती बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

भिवंडी वाडा मनोर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ मोठी असते. यात अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने खड्ड्यांची कितीही दुरूस्ती केली तरी काही दिवसातच हे खड्डे पुर्वीपेक्षा अधिक मोठे होतात. परिणामी अपघात होऊन निष्पाप लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम खात्याने या संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे ठरविले आहे. काँक्रीटीकरणासाठी अंदाजे 600 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असुन त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

2013 साली सुप्रीम कंपनीकडून या महामार्गाचे काम पुर्ण करण्यात आले व हा रस्ता वाहतूकीसाठी खुला झाला. मात्र आजही अनेक मोर्‍या, पुल तसेच वनखात्याच्या जमिनीलगतचे काम अपुरे असल्याने या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. तर सुप्रीम कंपनीच्या खिरापत वाटण्याच्या वृत्तीमुळे या भागातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी या प्रश्‍नावर मुग गिळून बसत असल्याने या मार्गाचे काम खराब झाले असल्याचा आरोप नागरीकांकडून होत असुन सुप्रीम कंपनीला काळ्या यादीत टाकून, उत्कृष्ट दर्जाचे काम करणार्‍या कंपनीला काँक्रीटीकरण करण्याचे काम देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चांगल्या आराखड्याला शासनाकडून मान्यता मिळावी, दर्जेदार महामार्ग व्हावा व यासाठी बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top