दिनांक 24 February 2020 वेळ 6:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जमावबंदीमुळे शेतकर्‍यांची निर्धार सभा स्थगित

जमावबंदीमुळे शेतकर्‍यांची निर्धार सभा स्थगित

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी केली होती गर्दी

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : यावर्षी राज्यात पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला असून लांबलेल्या पावसामुळे कोकण विभागातील शेतकर्‍यांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना आता सरकारी मदतीची अपेक्षा असून नुकसान भरपाईसाठी कोणतेही वेगळे नियम न लावता ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई मिळावी या मुख्य मागणीसाठी वाडा येथे शेतकर्‍यांनी निर्धार सभा आयोजित केली होती. या सभेला शेतकर्‍यांनी गर्दी केली. मात्र जिल्ह्यात 144 कलमान्वये जमावबंदी आदेश लागू असल्याने ही सभा स्थगित करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेतकरी आज ओल्या संकटात असून भातशेती असो की अन्य कसलेही पीक असो शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. अशा परिस्थितीत नेते मंडळी मात्र सत्ता स्थापन करण्याची गणिते जुळविण्यात मग्न असून त्यांना शेतकर्‍यांचे अश्रू दिसत नाहीत. एकही अधिकारी शेतकर्‍याच्या बांधावर पंचनामा करायला गेला नाही, असा आरोप शेतकरी नेते हरिभाऊ खाडे यांनी यानिमित्ताने केला असून आंदोलन करायला नेत्यांची गरज नाही. येत्या काळात शेतकरी आपली ताकत दाखवून देईल, असा विश्वास खाडे यांनी यावेळी बोलून दाखविला.

तर कागदपत्रांच्या कचाट्यात न अडकवता सरसकट नुकसान भरपाई शेतकर्‍याला मिळाली पाहिजे. विमा कंपन्यांनी आता आपले हात वर न करता शेतकर्‍यांना विम्याचा लाभ घ्यावा, अन्यथा त्यांची बरीगत नाही, असा इशारा विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे. तसेच रेशन दुकानात स्वस्तात तांदूळ उपलब्ध करून देतानाच सरकारने भातखरेदी केंद्रावर 4 हजार क्विंटल दराने भात खरेदी करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. 144 कलमाचा आदर करून आजची सभा स्थगित करीत असलो तरी येत्या 18 तारखेला शेतकरी तहसीलदार कार्यालयांना घेराव घालतील, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

comments

About Rajtantra

Scroll To Top