दिनांक 21 February 2020 वेळ 10:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » लांबलेल्या पावसाचा मासेमारीलाही फटका

लांबलेल्या पावसाचा मासेमारीलाही फटका

नुकसान भरपाई देण्याची मच्छीमारांची मागणी

वार्ताहर/बोईसर, दि. 6 : यंदा पावसाळा चांगलाच लांबल्याने शेतीसह मासेमारीला त्याचा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे समुद्रात अनेकवेळा धोक्याची स्थिती होती. परिणामी मच्छिमारांना या कालावधीत मासेमारी बंद ठेवावी लागली. तर नोव्हेंबर व डिसेंबर हा काळ मासळी सुकवण्याचा काळ असल्याने सततच्या कोसळणार्‍या पावसामुळे मासळी देखील कुजून गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसानींचे ज्याप्रमाणे पंचनामे करुन भरपाई दिली जाणार आहे, त्याप्रमाणे मच्छीमार बांधवांनाही भरपाई मिळावी, अशी मागणी जिल्ह्यातील मच्छिमार बांधव करीत आहेत.

पालघर जिल्ह्यात समुद्रकिनारी वसलेल्या एकूण 67 गावांतील मच्छीमार बांधव 2 हजार पेक्षा जास्त बोटींच्या माध्यमातून मासेमारी व्यवसाय करत आहे. पावसामुळे जून, जुलै व ऑगस्ट असे तीन महिने मासेमारीवर बंदी असल्याने वर्षभर मासे विकून कमावलेल्या पैशातून हे तीन महिने मच्छीमार बांधव आपला संसार हाकत असतात. यानंतर सप्टेंबरपासून मासेमारीसाठी समुद्रात बोटी जायला सुरुवात होते व मोठ्या प्रमाणात मच्छिमार बांधवांचा व्यवसाय सुरु होतो. मात्र यावर्षी नोव्हेंबर महिना उजाडला तरी सततचा पाऊस व त्यात चक्रीवादळाच्या धोक्यामुळे अनेकवेळा मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या बोटींना माघारी फिरावे लागले. त्यामुळे हातात मासे न लागताच डिझेलसाठी होणारा खर्च, बोटीवरील मजुरांची (खंड्या) मजुरी, त्यांचे जेवण तसेच मासेमारीसाठी खरेदी केलेले महागडे जाळे असा सर्व खर्च वाया गेल्याने मच्छीमार बांधवही हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, मासेमारीसाठी अनुकूल असलेल्या काळात मच्छीमारांनी बोंबिल, मांदेळी, करंदी अशा माशांची मासेमारी केली. ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिना हा मासळी सुकवून ठेवण्याचा कालावधी असतो. मात्र अवकाळी पावसामुळे अनेक मच्छीमारांची सुकण्यासाठी ठेवलेली मासळी कुजून गेली आहे. तर नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु होताच या सुक्या मासळीची मागणी वाढते. मात्र यंदा थंडीचा पत्ताच नसल्याने सुक्या मासळीच्या मागणीतही घट झाली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे अधिकारी वर्ग नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करत आहेत. त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या नुकसानीचेही पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी व प्रत्येक बोट मालकाला दीड लाखापर्यंत मदत देण्यात यावी, अशी मागणी पालघरमधील मच्छिमारांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top