दिनांक 24 February 2020 वेळ 8:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कृषी राज्यमंत्र्यांनी केली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

कृषी राज्यमंत्र्यांनी केली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी निधी कमीपडू देणार नाही- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधावासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली असून हा निधी जर कमी पडला तर शेतकरी बांधावासाठी आणखीन निधी उभारला जाईल. शेतकरी वर्गासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या वाडा, वसई तसेच पालघर तालुक्यातील शेती पिकांची पाहणी कृषी राज्यमंत्री खोत यांनी आज दिवसभरात केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. त्यांच्यासोबत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार मनीषा चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक काशीनाथ तरकसे, वाडा तहसीलदार उद्धव कदम तसेच कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अती वृष्टी झालेल्या शेतशिवारांना खोत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग व तालुका प्रशासनास लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्ध्वस्त झाले असतानाच पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश खोत यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. खोत यांच्या या पाहणी दौर्‍यात वाडा, वसई, पालघर या तीन तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असल्याचे तसेच पावसासह जोरात वारा असल्यामुळे भाताचे पीक झोपले असुन आता हे पीक शेतकर्‍यांच्या हाती लागणार नाही, असे निर्दशनास आले आहे.

दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना दिले असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भातपिक, भाजीपाला, फळपिकांचेही मोठे नुकसान झाले असून या सर्व ठिकाणची पाहणी केली जाणार आहे. गावात जाऊन शेतकर्‍यांना भेटून त्यांना मदतीसाठी धीर देत आहोत. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई निश्चितपणे दिली जाणार आहे. नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी योजना तयार करण्यात आली आहे, असेही खोत यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण 3-4 दिवसात करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठवू. ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणांचे पंचनामे करणे सुरु झाले आहेत. या सोबतच कर्ज कुणी घेतले, पीक विमा कुणी काढला याची माहितीही कृषी विभागाचे अधिकारी घेत आहेत, असेही कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top