दिनांक 26 May 2020 वेळ 5:14 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पीक नुकसानीची भरपाई तात्काळ देणार! -पालकमंत्री

पीक नुकसानीची भरपाई तात्काळ देणार! -पालकमंत्री

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पिक नुकसानी संदर्भात आढावा बैठक संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 3 : पालघर जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासनाला देऊन पिक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री चव्हाण पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत खासदार राजेंद्र गावीत, नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील व श्रीनिवास वनगा, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ तरकसे व वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले भातपिक तसेच काढणी झालेल्या भातपिकासह इतरही भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांसमोर संकट उभे राहिले आहे. मात्र शेतकर्‍यांनी या संकटामुळे खचून न जाता त्याचा धीराने सामना करावा. राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन शेतकर्‍यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नव्हता, अशा शेतकर्‍यांना राज्य शासन नुकसानभरपाई देईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी नुकसानीमुळे खचून जाऊ नये. परतीच्या पावसामुळे ओढावलेल्या या संकटात राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली असून या नुकसानीची माहिती राज्य शासनाला देणार असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले

जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासनाला देऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top