दिनांक 24 February 2020 वेळ 7:02 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

पालघर जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

सलग दुसर्‍या वर्षी जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 31 : पालघर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान केले असुन मागील 3 महिन्यांपासुन शासनाकडून या नुकसानीची भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट पाहत आहेत. असे असताना आता जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर परतीच्या पावसाने अवकृपा केली असुन ऑगस्टमधील आसमानी संकटातून कसेबसे सावरलेले भातपीक परतीच्या पावसामुळे शेतातच कुजू लागले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. सध्यस्थिती बघता शेतकर्‍यांच्या हाती 40 टक्के पीकही येण्याची शक्यता नसुन जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे गतसाली कोरड्या दुष्काळाच्या गर्तेत अडकलेला शेतकरी सलग दुसर्‍या वर्षी ओल्या दुष्काळाच्या गर्तेत अडकला आहे. दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र सत्तेची समीकरणे आणि आकडेमोडीत मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्ह्यात खरीपाचे मुख्य पीक असलेल्या भातशेतीची अवस्था परतीच्या पावसाने दयनीय केली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील 7 हजार 220 हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाल्याचा सरकारी यंत्रणांचा पंचनाम्यानंतरचा अहवाल आहे. यामध्ये प्रामुख्याने वाडा, वसई, जव्हार, मोखाडा, पालघर व विक्रमगड या तालुक्यांचा समावेश आहे. या नुकसानग्रस्त क्षेत्राला नुकसान भरपाई म्हणून भातक्षेत्रासाठी 6 हजार 800, तर बागायतीसाठी 13 हजार 800 रुपयांची प्रती हेक्टरी मदत शासनाने निश्चित केली आहे. त्यासाठी जिल्हा कृषी कार्यालयाने केंद्र सरकारकडे सुमारे 6 कोटी रूपयांची मागणी केली आहे. मात्र, चार महिने उलटूनही ही मदत शेतकर्‍यांच्या पदरी पडलेली नाही.

त्यानंतर उर्वरित भात शेती आपल्या पदरी पडून वर्षाचा उदरनिर्वाह होईल, या आशेवर शेतकर्‍यांनी मोठी मेहनत केली व या मेहनीतीच्या जोरावर त्यांची शेती पिकांनी बहरली देखील होती. पीक काढणीसाठी सज्ज झाली असतानाच परतीच्या पावसाने मात्र कहर केला. त्यामुळे काढणीसाठी आलेले भातपीक शेतातच आडवे झाले आहे. तर काही तालुक्यांत पीक काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले असताना, मुसळधार पावसाचा त्यालाही फटका बसला आहे. काही तालुक्यांमध्ये भातपीक सडले, कुजले आणि काढलेल्या भाताला पुन्हा कोम फुटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भाताचा पेंढा कुजल्याने जनावरांच्या चार्‍याचा देखील प्रश्न निर्माण होणार आहे.

गतसाली जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यातील 31 गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. याउलट यावर्षी आदिवासी तालुक्यांसह अन्य तालुक्यांमधील भातशेतीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यंदाच्या दिवाळीला शेतकर्‍यांच्या घरी तर सोडाच, खळ्यावरही धान्यं आलेले नाही. त्यामुळे दिवाळी ओल्या दुष्काळाच्या सावटाखालीच गेली आहे. दिपोत्सवात अनेक शेतकर्‍यांच्या घरी गोडधोड बनवले गेले नाही. प्रतीवर्षी दसरा सणाला हळवे भातपीक शेतकर्‍यांच्या घरी येते. मात्र, यावर्षी आजपर्यंत पाऊस कोसळत असल्याने गरवे आणि हळवे अशी दोन्ही भातपीके शेतातच सडत पडली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती 50 टक्के पीकही लागणार नसुन पेंढा कुजल्याने जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न देखील उद्भवणार आहे.

छावणीला आलेले भातपीक शेतातच सडू लागले आहे. आमच्या हाती 40 टक्के पीकही येणार नाही. त्यामुळे पुढील वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. पेंढा कुजल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार असुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून आम्हा शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. -नितीन गोतारणे, पिडीत शेतकरी, गातेस, वाडा.

यंदा शेतकर्‍यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. मी जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष विदारक स्थिती अनुभवली आहे. त्यामुळे यंदा मी घरी दिवाळी साजरी केली नाही. या भागासह संपुर्ण पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मी शासनाकडे करणार आहे. -सुनिल भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा.

ऑगस्टमध्येही भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. तर आताही भातपीकाचे परतीच्या पावसाने नुकसान होत आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे सुरू केले आहेत. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने ओला दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. -बालाजी सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी

comments

About Rajtantra

Scroll To Top